कणकवली नगरपंचायत विशेष सभा : त्या' ठेकेदारांना 'ब्लॅक लिस्ट' मध्ये टाका : समीर नलावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:21 PM2019-03-08T13:21:39+5:302019-03-08T13:24:20+5:30

कणकवली शहरातील बाजारपेठ तसेच अन्य भागातील रस्त्यांचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या व पाटकर कॉम्प्लेक्स ते कामत सृष्टी पर्यंतच्या गटाराचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराना नगरपंचायतीच्यावतीने नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कामाबाबत पुढील काहीच कार्यवाही होत नाही . त्यामुळे संबधित ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे, अशी सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मुख्याधिकाऱ्याना केली.

Kankavli Nagar Panchayat SPECIAL MEMBER: Add 'Contractors to Black List': Sameer Nalawade | कणकवली नगरपंचायत विशेष सभा : त्या' ठेकेदारांना 'ब्लॅक लिस्ट' मध्ये टाका : समीर नलावडे 

कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत गुरुवारी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Next
ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत विशेष सभा  त्या' ठेकेदारांना 'ब्लॅक लिस्ट' मध्ये टाका : समीर नलावडे 

कणकवली : कणकवली शहरातील बाजारपेठ तसेच अन्य भागातील रस्त्यांचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या व पाटकर कॉम्प्लेक्स ते कामत सृष्टी पर्यंतच्या गटाराचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराना नगरपंचायतीच्यावतीने नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कामाबाबत पुढील काहीच कार्यवाही होत नाही . त्यामुळे संबधित ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे .अशी सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मुख्याधिकाऱ्याना केली.

कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड , मुख्याधिकारी मनोज उकिर्डे उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षानी सभेत उपस्थित झालेल्या मुद्यावर बोलताना ही सूचना केली.

या सभेत प्रामुख्याने कणकवलीतील खराब झालेल्या रस्त्यांच्या कामाचा मुद्दा चर्चेत आला. तसेच पाटकर कॉम्प्लेक्स ते कामत सृष्टी पर्यंतच्या गटाराचे काम बरेच दिवस अपूर्णावस्थेत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होतो. असा मुद्दा नगरसेवक अबीद नाईक यांनी उपस्थित केला होता.

त्याविषयी बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शहरातील रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेले सहदेव चव्हाण व गटाराच्या कामाचा ठेका घेतलेले ए. पी.सावंत या ठेकेदाराना नगरपंचायत प्रशासनाने नोटीस बजावूनही त्याची दखल त्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे त्या ठेकेदारांना' ब्लॅक लिस्ट ' मध्ये टाकून उर्वरित काम अन्य ठेकेदाराकडून करून घ्यावे आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी सूचना केली.

शहरातील अनेक ठिकाणचे पथदीप बंद आहेत. ते तत्काळ सुरू करावेत अशी मागणी नगरसेवक अबीद नाईक यांनी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यानी पथदीपांबाबतचा संबधित ठेका शासनाने राजस्तरावरून एका कंपनीला दिलेला आहे. त्या कंपनीशी संपर्क करण्यात आल्याचे सांगितले.

कणकवली साईंनगर येथील उद्यानात नागरिकांच्या मागणीनुसार सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला . सन २०१८-१९ सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान (जिल्हास्तर) योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीतून टेंबवाडी रस्ता जमीन भूसंपादन तसेच इतर कामे करण्यात येणार आहेत. तर सन २०१९-२० च्या निधीतून आणखीन काही कामे नगरसेवकांकडून सुचविण्यात आली.

शहरातील उद्यानांच्या ठिकाणी सुरक्षेसाठी नगरपंचायतीने कर्मचारी नियुक्त करावा अशी मागणी मेघा गांगण यांनी केली. तर काही उद्याने ही 'लव्हर्स पॉईंट' बनली असल्याचे अभिजित मुसळे म्हणाले. त्यामुळे उद्यानांच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून कणकवली शहरात भूमिगत वीज वाहिनीच्या कामाकरता रस्ते खोदाई करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. ही परवानगी देण्यापूर्वी मुख्याधिकाऱ्यानी वीज वितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करावी आणि त्यानंतरच परवानगी द्यावी. असे यावेळी ठरविण्यात आले. वरचीवाडी गणपती साना येथे घाट बांधणे व रस्ता तयार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

कणकवली मराठा मंडळ येथील स्मशानभूमीत येणाऱ्या काही नागरिकांकडून लाकडांचा अतिरिक्त वापर केला जात आहे. तसेच लाकडांसाठी आकारले जाणारे शुल्कही अनेकांकडून जमा केले जात नसल्याने नगरपंचायतीच्या लेखा परीक्षणात त्या मुद्यावर आक्षेप घेण्यात आल्याचे यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच लाकडांबाबतचा निर्णय या सभेत घ्यावा असे सुचविले.

यावेळी झालेल्या चर्चेअंती त्या स्मशानभूमीत कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे तसेच सिसीटीव्ही कॅमेरा बसविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच लाकडांचे मूल्य आकारून संबंधितांना पावती देण्याचेही ठरविण्यात आले. माणुसकीच्या भावनेतून या प्रश्नावर तोडगा काढावा असे बंडू हर्णे यांनी यावेळी सुचविले.

शिवाजीनगर येथील उद्यानातील पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी असलेल्या जिन्याला लोखंडी दरवाजा लावून तो बंदिस्त करावे. तसेच ते उद्यान नागरिकासाठी खुले करावे असेही यावेळी ठरविण्यात आले. तेथील रस्ता सहा मीटरचा आहे. मात्र, सद्यस्थितीत तो तेव्हढ्या रुंदीचा असल्याचे दिसत नाही . त्याबाबतही लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे संजय कामतेकर यांनी सुचविले.

यावेळी विविध प्रकारच्या निधीतून करायच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. काही नगरसेवकांनी विविध कामे यावेळी सुचविली. या सभेला विरोधी नगरसेविका सुमेधा अंधारी यांच्या व्यक्तिरिक्त अन्य कोणीही नगरसेवक उपस्थित नव्हते.

विद्युत दाहिनी बसविणार !

कणकवली मराठा मंडळ येथील स्मशानभूमीत विद्युुत दाहिनी बसविण्याबाबत या सभेत चर्चा करण्यात आली. ज्या नागरिकांना पारंपारिक पध्द्तीने अंत्यसंस्कार करायचे असतील त्यांच्यासाठी सध्या स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध आहे.

मात्र, आधुनिक पध्द्तीने व प्रदूषण विरहित पध्द्त ही विद्युत दाहिनीमुळे शक्य आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची सोय उपलब्ध करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दोन्ही प्रकारे अंत्यसंस्कार करता येणे लवकरच शक्य होणार आहे.

 

Web Title: Kankavli Nagar Panchayat SPECIAL MEMBER: Add 'Contractors to Black List': Sameer Nalawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.