कणकवली नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर, कार्यालयासमोर शासनविरोधी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:46 PM2019-01-01T13:46:38+5:302019-01-01T13:50:24+5:30
कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार पासुन बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे कणकवली शहरातील कचरा उचलण्याच्या सेवेबरोबरच इतर सेवाही ठप्प झाल्या आहेत.
कणकवली : कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार पासुन बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे कणकवली शहरातील कचरा उचलण्याच्या सेवेबरोबरच इतर सेवाही ठप्प झाल्या आहेत.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेशी संलग्न असलेल्या कणकवली नगरपंचायत कर्मचारी संघटनेने हे बेमुदत संप आंदोलन पुकारले आहे.
या नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शासनाचा निषेध करण्यासाठी २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान काळ्या फिती लावत शासनाचा निषेध केला होता. आता आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.
कणकवली नगरपंचायत अंतर्गत ५५ कंत्राटी आणि ३७ कायमस्वरूपी कर्मचारी संपावर गेले आहेत. मंगळवारी सकाळी हे सर्व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उर्फ़ भाई साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नगरपंचायत कार्यालया जवळ एकत्र आले. तसेच त्यांनी निदर्शने केली. यावेळी घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे किशोर धुमाळे, मनोज धुमाळे, प्रवीण गायकवाड़, सतीश कांबळे, विश्वनाथ शिंदे, प्रशांत राणे, भगवान कदम आदी उपस्थित होते.
या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कणकवली शहरातील नगरपंचायतीच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. मात्र, नागरिकांना या संपामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल फलक लावून संघटनेने दिलगीरी व्यक्त केली आहे.