कणकवली नगरपंचायतीच्या कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे ; सुशांत नाईक यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:04 PM2018-01-11T18:04:29+5:302018-01-11T18:09:22+5:30
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने काढ़ण्यात येणाऱ्या शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे असतात. आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर जादा दराची निविदा रद्द करण्यात येवून पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने काढ़ण्यात येणाऱ्या शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत कायमच साटेलोटे असतात. यावर्षीची निविदाहि जादा दर दिलेल्या ठेकेदाराचीच मंजूर करण्यात आली होती. मात्र , ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांचे त्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर जादा दराची निविदा रद्द करण्यात येवून पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.
येथील विजय भवनमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, शहरप्रमुख शेखर राणे, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, सुजीत जाधव, भुषण परुळेकर, अजित काणेकर,तेजस राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी सुशांत नाईक म्हणाले, कणकवली नगरपंचायतीच्यावतीने शहरातील कचरा उचलण्याची एक वर्षाच्या कालावधिसाठीची निविदा मे महिन्यात प्रसिध्द झाली होती. प्रति घर 195 रूपये असा जादा दर नमूद केलेल्या ठेकेदाराची निविदा मंजूर करुन त्याला ठेका देण्यात आला होता .तर कमी दराची म्हणजेच प्रति घर 145 रूपये दर नमूद केलेल्या दुसऱ्या ठेकेदाराची निविदा नामंजूर करण्यात आली होती.
या निविदेबाबतचे सत्य शिवसेना नगरसेवकांच्यासमोर आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांचे त्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. त्याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित जादा दराची निविदा रद्द करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्याना दिले. त्यामुळे जादा दराची निविदा रद्द करण्यात आली.
त्यानंतर परत निविदा प्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी कचरा उचलण्याची तीच निविदा प्रति घर 143 रूपये दराने त्याच ठेकेदाराने भरली. आणि ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे कचरा उचलण्याचा ठेका त्याला मिळाला आहे.
कणकवलीतील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या जागरूकपणामुळे तसेच आमदार वैभव नाईक यांच्या दक्षतेमुळे कणकवली नगरपंचायतीचे म्हणजेच पर्यायाने शहरातील नागरिकांचे प्रति महीना 4 लाख रूपये वाचले आहेत. तसेच या निविदेपोटि जादा खर्च होणारे नगरपंचायतीचे वार्षिक 48 लाख रूपये वाचले आहेत. हे शिवसेना नगरसेवकांमुळेच घडले आहे.
सध्या शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून दरदिवशी 50 टक्केच कचरा उचलला जातो. त्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात. याबाबतही मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच नगरपंचायतीत पारदर्शक कारभारासाठी यापुढेही शिवसेना नगरसेवक कारभारावर बारकाईने लक्ष ठेवतील असेही सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.
'त्या' नगरसेवकांची आगपाखड़ का?
दरवर्षी कणकवली शहरातील हा कचरा उचलण्याच्या ठेका एकाच ठेकेदाराला दिला जातो. तो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता आहे. ही निविदा प्रक्रिया संगनमतानेच केली जाते.
याबाबत नगरपंचायत सभेत आम्ही मुद्दा उपस्थित केला असता त्यावेळी स्वाभिमानच्या नगरसेवकांनी आगपाखड केली होती. ती का करण्यात आली ? त्यामागचे नेमके गुपित काय? हे त्यांनी जनतेच्या समोर जाहिर करावे.असेही सुशांत नाईक यांनी यावेळी म्हणाले.
नगरपंचायत कारभारावर वचक ठेवणार !
कणकवली शहरातील नागरिकांशी आमची बांधीलकी आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर शिवसेनेचे नगरसेवक वचक ठेवण्याचे काम करीत आहेत. प्रशासनाने नागरिकांना चांगल्या सुविधा पूरवाव्यात यासाठी आमचा कायमच आग्रह रहाणार आहे.असेही सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.