कणकवलीतील रुग्णांना मिळणार मोफत रक्त, समीर नलावडे यांचा उपक्रम
By सुधीर राणे | Published: April 28, 2023 01:39 PM2023-04-28T13:39:12+5:302023-04-28T14:22:35+5:30
कणकवली: कणकवली शहराचा प्रथम नागरिक म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या तसेच कर्तव्ये आहेत. समाज ऋण फेडतानाच 'रक्तदान हे श्रेष्ठ दान' ...
कणकवली: कणकवली शहराचा प्रथम नागरिक म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या तसेच कर्तव्ये आहेत. समाज ऋण फेडतानाच 'रक्तदान हे श्रेष्ठ दान' असा संदेश देत एक नवीन उपक्रम आम्ही हाती घेत आहोत.कणकवली शहरातील कोणत्याही नागरिकाला अपघात किंवा अन्य कोणत्याही उपचाराच्या दरम्यान रक्ताची गरज भासल्यास पूर्णपणे मोफत रक्त पुरवठा करण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत कार्यालयात शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांशी समीर नलावडे यांनी संवाद साधला. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, गटनेते संजय कामतेकर, बंडू गांगण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते .
समीर नलावडे म्हणाले, अनेकवेळा रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने मोठा धोका निर्माण होतो. काहीजणांना प्रणालाही मुकावे लागते. त्यामुळे आम्ही कणकवली शहरातील नागरिकांना आवश्यकतेनुसार मोफत रक्त उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून कणकवली शहरातील नागरिकांना शासकीय नियमाप्रमाणे रक्ताची देय रक्कम भरणा करावी लागू नये व कणकवली शहरातील रुग्ण तसेच त्याच्या कुटुंबीयांना अत्यावश्यक वेळी मोफत रक्तपुरवठा व्हावा हा यामागील उद्देश आहे.
शहरातील नागरिकांना अपघात, प्रसूती किंवा अन्य कोणत्याही उपचाराच्या दरम्यान रक्ताची आवश्यकता भासल्यास ओरोस येथे रक्त पेढीत जावे लागते. त्याकरता शासकीय नियमाप्रमाणे रक्कम भरणा करावी लागते. मात्र, ही रक्कम भरणा करत असताना नागरिकांना आर्थिक ताण सहन करावा लागू नये व वेळेत रक्त उपलब्ध व्हावे. या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, लोकाभिमुख कारभाराची जनतेला उणीव भासू नये व शहरातील जनतेने जो विश्वास ठेवून नगरपंचायत मध्ये सत्ता दिली, तो विश्वास सार्थ ठरावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत आहोत. आमदार नितेश राणे यांनी शहरासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या पाठोपाठ लोकाभिमुख काम करत राहणे हे आमचे ध्येय आहे. कणकवली शहरातील कोणत्याही नागरिकाला जर रुग्णालयात कुठेही उपचार करताना रक्ताची आवश्यकता असल्यास थेट आपल्याशी अथवा कणकवली भाजप शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन देखील समीर नलावडे यांनी यावेळी केले.