CoronaVirus :कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:11 PM2020-06-05T17:11:13+5:302020-06-05T17:12:58+5:30
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय हे कोविडसाठी राखीव करण्यात आलेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसहीत अत्यावश्यक उपचार करण्याची प्रमुख जबाबदारी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयावर आलेली आहे. अशा स्थितीत या रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या असल्याची माहिती कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली : सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय हे कोविडसाठी राखीव करण्यात आलेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसहीत अत्यावश्यक उपचार करण्याची प्रमुख जबाबदारी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयावर आलेली आहे. अशा स्थितीत या रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या असल्याची माहिती कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांची संदेश पारकर यांनी भेट घेतली. तसेच उपजिल्हा रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, पालकमंत्र्यांशी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मोठा शस्त्रक्रिया विभाग सुरू करणे व इतर समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेंसहीत उर्वरित समस्याही तातडीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांशी चर्चा करून समस्या मार्गी लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. डॉ. धनंजय चाकुरकर यांनी पूर्णवेळ भूलतज्ज्ञ देण्याचे मान्य केले आहे, तसेच येथे एकच स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने आठवड्यातून दोन वेळा दुसरा स्त्रीरोगतज्ज्ञ देण्यात येईल.
येथील ट्रामा केअर सेंटरमधील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रासम यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेले होते. मात्र, सद्यस्थितीत तेथे उपचार होत नसल्याने त्यांना कणकवली येथे पाठविण्यात यावे. तसेच येथे प्रशस्त असा शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले असल्याचे पारकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पूर्णवेळ फिजिशियन देण्याबाबतही सूचना दिलेल्या आहेत.
योजना कार्यान्वित करणार
उपजिल्हा रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजना मंजूर आहे. दीड महिना झाला तरीही इंटरनेट, संगणक व इतर किरकोळ कामांसाठी सुमारे एक लाख रुपयांची गरज आहे. या कामांसाठी योजना सुरू करता आलेली नसल्याचे आमच्या चर्चेदरम्यान स्पष्ट झाले.
याबाबतही तातडीने कार्यवाही करून गोरगरिबांसाठीची ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रयत्न आपण करणार असल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले. तसेच मास्क, पीपीई किट, सॅनिटायझरही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पारकर यांनी यावेळी सांगितले.