करुळ घाटात ट्रक उलटला
By admin | Published: May 28, 2014 01:11 AM2014-05-28T01:11:03+5:302014-05-28T01:35:10+5:30
चालकाचे नियंत्रण सुटले मोठी वित्तहानी टळली
वैभववाडी : करुळ घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठड्याला धडकून ट्रक दरीत उलटला. मात्र, झाडाच्या आधाराने ट्रक स्थिरावल्यामुळे जिवीत व मोठी वित्तहानी टळली. आष्टाहून (जि. सांगली) हा ट्रक बियाणे घेऊन कुडाळ येथे जात होता. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडला. यल्लप्पा रामचंद्र वाघमारे (रा. मोहोळ, जि. सोलापूर) हा आष्ट्याहून ट्रकमधून (एम. एच. १३, ए-३४९१) कुडाळ संघाचे बियाणे घेऊन करुळघाटमार्गे निघाला होता. घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक संरक्षण कठड्याला धडकून दरीत उलटला. परंतु दरीत दहा ते बारा फुटावर असलेल्या झाडाच्या आधारावर ट्रक स्थिरावला. अपघातात ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे. ट्रक दरीत उलटल्यानंतर चालक यल्लप्पा वाघमारे केबिनमधून सहीसलामतपणे बाहेर पडला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लाड यांच्या समवेत पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातात जीवित हानी झाली नसल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास टाकला. (प्रतिनिधी)