कर्नाटकच्या डॉक्टरांचे पथक येणार
By admin | Published: January 29, 2016 11:43 PM2016-01-29T23:43:52+5:302016-01-30T00:02:02+5:30
योगेश साळे : केर गावातील माकड तापाचे समूळ उच्चाटन करणार
सिंधुदुर्गनगरी : कर्नाटक राज्यात १९६० मध्ये उद्भवलेल्या कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (माकडताप) या आजारावर संशोधनाअंती ठोस औषधोपचाराचा शोध लावणारी कर्नाटकातील शासकीय तज्ज्ञ डॉक्टरांची पाच सदस्यीय टीम २ व ३ फेब्रुवारी रोजी दोडामार्ग तालुक्यातील केर या गावी दाखल होणार आहे. त्यामुळे केर येथे उद्भवलेल्या माकडतापाच्या साथीचे समूळ उच्चाटन होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
दोडामार्ग तालुक्यातील केर गावात पंधरा ते वीस दिवसांपासून कॅसनूर फॉरेस्ट डिसीज या तापाचे रुग्ण आढळायला सुरुवात झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली होती. त्यातच एक ३५ वर्षीय तरुणाचा या आजाराने बळी गेल्याने केर गावात भितीचे वातावरण पसरले होते. आरोग्य यंत्रणेनेही या तापावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या. त्यातच पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या पथकालादेखील पाचारण करण्यात आले होते. या संस्थेने ३० रुग्णांचे रक्त नमुने तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत नेले होते. यातील १८ रुग्णांचे रक्त नमुने पॉझिटीव्ह आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, आता केर या ठिकाणी नवीन रुग्ण नाहीत. असे असले तरी कर्नाटक राज्यातील सिमोगा जिल्ह्यातील डॉ. राजेश यांच्या नेतृत्वाखाली चार तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जिल्ह्यात दाखल होणार आहे.
कर्नाटकातील शासकीय संस्थेने कर्नाटकात उद्भवलेल्या माकडतापावर संशोधन करून यशस्वी पर्याय शोधून काढत या आजाराचे समूळ उच्चाटन केले होते. त्यामुळे या संस्थेतील डॉक्टरांच्या टीमला केर येथे पाचारण करण्यात येणार असून यावर ठोस औषधोपचारांची उपाययोजना करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी ही टीम जिल्ह्यात येण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
परिसरात सर्वेक्षण : लसीकरण करणार
केर गावातील आजूबाजूच्या ५ किलोमीटर परिसरात सर्वेक्षण व फवारणी करण्यात आली आहे. गोचिड निर्मूलनासाठी आवश्यक ती सर्व औषधांची व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरु आहे. पशुसंवर्धन विभाग व वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा समन्वय घेण्यात आला आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्यासंदर्भात वरिष्ठ (राज्य) पातळीवरून हालचाली सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
केर येथील उमेश देसाई यांच्या रक्ताचा अहवाल नकारात्मक आला असला, तरी त्यांचा मृत्यू माकडतापाच्या जुन्या विषाणंूमुळे (ओल्ड व्हायरस) झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. माकडतापाची लागण त्यांना काही महिन्यांपूर्वीच झाली होती. पण उमेश देसाई यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांनी तो तोलला, असा खुलासाही त्यांनी केला.