करुळ घाटात एस.टी.कोसळली
By admin | Published: June 8, 2014 01:08 AM2014-06-08T01:08:04+5:302014-06-08T01:13:43+5:30
आपत्कालीन प्रात्यक्षिक : प्रशासकीय यंत्रणेची उडाली झोप
वैभववाडी : करुळ घाटातील दरीत एस.टी. कोसळण्याच्या वृत्ताने प्रशासकीय यंत्रणेसह तालुकावासीयांची अक्षरश: झोप उडाली. बांधकाम, आरोग्य, पोलीस, पंचायत समिती कृषी आदी विभागाची पथके घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी पोहोचल्यावर ते आपत्कालीन प्रात्यक्षिक असल्याचे स्पष्ट होताच साऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास करुळ घाटात एस.टी. कोसळल्याचा दूरध्वनी तहसीलमधून पोलिसांना गेला. त्यानंतर हे वृत्त वाऱ्यासारखे संपूर्ण तालुक्यात पसरले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचीही तारांबळ उडाली. प्रत्येक विभागाचे पथक तातडीने घाटाकडे रवाना झाले. मात्र अपवाद होता एस.टी. विभागाचा. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लाड कर्मचाऱ्यांसह दोरखंड घेऊन घाटात पोहोचले. त्या पाठोपाठ ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी गेली.
सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता मुकुंद कचरे, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, मंडल कृषी अधिकारी शरच्चंद्र नानिवडेकर तसेच सभापती नासीर काझी, उपसभापती बंड्या मांजरेकर आदी घाटात पोहोचले. त्यावेळी नियोजित घटनास्थळी उपस्थित तहसीलदार विजय जाधव यांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे घटनास्थळी जमलेल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. घाटात रुग्णवाहिकेसह शासकीय वाहनांची गर्दी झाल्याने घाटातून प्रवास करणाऱ्यांना नेमके काय घडले याचा उलघडा होत नव्हता. त्यापैकी काही जण घाट मार्गात जागोजागी थांबून विचारणा करत होते. आपत्कालीन प्रात्यक्षिकामुळे सगळ्यांचा पोपट झाला. परंतु आज दिसलेली सतर्कता खऱ्याखुऱ्या आपत्तीवेळी उपयोगात येईल का? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. (प्रतिनिधी)