करुळ घाटात कार दरीत कोसळली; कणकवलीतील राणे दाम्पत्य बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 10:13 AM2023-06-30T10:13:27+5:302023-06-30T10:13:38+5:30
कार अपघातातून सुदैवाने बचावलेल्या जखमी राणे दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्यात आली होती.
- प्रकाश काळे
वैभववाडी(सिंधुदुर्ग): गगनबावडा येथून माघारी परतणारी कणकवली तालुक्यातील कार करुळ घाटात ४०० फूट दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेतून सुदैवाने कारमधील दाम्पत्य बचावले असून पोलिस आणि सह्याद्री जीवरक्षकच्या पथकाने त्यांना दरीतून सुखरुप बाहेर काढून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
कणकवली तालुक्यातील शेखर मनोहर राणे(३७) व त्यांची पत्नी दर्शना शेखर राणे(३४) गगनबावडा येथे गेले होते. तेथून ते रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास परत येत असताना करुळ घाटाच्या मध्यावरील 'सुर्यास्त दर्शन' या ठिकाणाहून नियंत्रण सुटल्याने त्यांची वॅगनर(क्रमांक एम एच ०४; ईटी- ५२३४ ) कार ४०० फूट खोल दरीत कोसळली. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकाने हा अपघात पाहिला.
त्या वाहन चालकाने करुळ तपासणी नाक्यावर अपघाताची माहिती दिली. त्यामुळे बचावकार्यासाठी पोलिस आणि सह्याद्री जीवरक्षक पथक तातडीने अपघातस्थळी पोहोचले. तेव्हा दरीतून विव्हळण्याचा आवाज ऐकायला येत होता. त्यामुळे पोलिस आणि सह्याद्री जीवरक्षक पथकाचे कार्यकर्ते व ट्रकचालक तुकाराम कोकरे, शिवाजी गायकवाड व अभिमन्यू पाताडे यांनी पाऊस आणि अंधाराची पर्वा न करता ४०० फूट दरीत उतरुन मोठ्या कसरतीने राणे दाम्पत्याला दरीतून सुखरुप बाहेर काढले.
कार अपघातातून सुदैवाने बचावलेल्या जखमी राणे दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्यात आली होती. मात्र ती रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यातच बंद पडल्यामुळे पोलिसांच्या वाहनातून त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.