करुळ घाटमार्ग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बंद?, तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 11:56 AM2023-12-27T11:56:10+5:302023-12-27T11:56:47+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची प्रतीक्षा
प्रकाश काळे
वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासह करुळ घाटचेही काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी करुळ घाटाची वाहतूक किमान ४ महिने बंद ठेवावी लागणार आहे. दरम्यान महामार्गाच्या दुपदरीकरणास सुरुवात झाली असून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळताच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करुळ घाटमार्गाची वाहतूक बंद केली जाण्याचे संकेत मिळत आहेत.
तळेरे-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील नाधवडे सरदारवाडी ते कोकिसरे घंगाळेवाडी पेट्रोलपंप व करुळ घाटपायथ्यापासून गगनबावडा या २१ किलोमीटर लांबीच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी २४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यामध्ये ९ किलोमीटर करुळ घाटमार्ग तर १२ किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा अंतर्भाव आहे.
करुळ घाटमार्गाचे ७ मीटरने तर अन्य ठिकाणी १० मीटरने रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सध्या नाधवडेतून मोऱ्यांच्या बांधकामासह दुपदरीकरणास सुरुवात झाली आहे. करुळ घाटमार्गातही गटारे, संरक्षण कठड्यांची कामे सुरू आहेत. मात्र घाटरस्ता अरुंद असल्याने काँक्रिटीकरण करताना एकेरी वाहतूक सुरू ठेवणे किंबहुना एकेरी वाहतूक सुरू ठेवून काम करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अशक्यप्राय आहे. त्यामुळे करुळ घाटातील काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी हा घाटमार्ग पूर्णपणे बंदच ठेवावा लागणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क सुरु आहे.
महामार्ग ‘भुयारी’ने जोडला जाणार
कोकिसरेतील रेल्वेफाटकाला पर्याय म्हणून भुयारी मार्ग तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ६५ कोटी शासनाने मंजूर केले. आहेत. त्यांचे भूमिपूजन मागच्या वर्षी निश्चित झाले होते. परंतु ते अचानक रद्द झाले. परंतु, भुयारी मार्गाच्या कामाची पूर्वतयारी झाली असून नव्याने होत असलेला तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग या रेल्वे फाटक आला फाटा देऊन भुयारी मार्गाने जोडला जाणार आहे.
करुळ घाटातील काँक्रिटीकरण व अन्य कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस यंत्रणा राबवावी लागणार असल्याने घाटमार्ग पूर्णपणे बंदच ठेवावा लागणार आहे. मात्र, घाटरस्ता बंद ठेवण्याचा अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचा असल्यामुळे त्यादृष्टीने आमच्या अधिकाऱ्यांमार्फत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून बोलणी सुरू आहेत. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने सध्या या मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करुळ घाटमार्गाची वाहतूक बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळण्याची शक्यता आहे. - अतुल शिवनिवार, उपअभियंता- राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण