तब्बल १३ महिन्यांनंतर करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू, वाहनचालकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:46 IST2025-02-25T16:44:23+5:302025-02-25T16:46:10+5:30
घाटमार्ग वाहतुकीस बंद केल्यामुळे या मार्गावरील पर्यटकांची संख्या पूर्ण रोडावली होती

तब्बल १३ महिन्यांनंतर करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू, वाहनचालकांना दिलासा
वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट तब्बल १३ महिन्यांनंतर सोमवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीस खुला झाला. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. घाटमार्गाच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरण व संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी गेल्या वर्षी २२ जानेवारीला हा घाट वाहतुकीस बंद करण्यात आला होता.
कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १६ किलोमीटर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी १७१ कोटींची मंजुरी मिळाली होती, हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नाधवडे ते गगनबावडा या २१ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे कॉंक्रिटीकरणासाठी २४९ कोटी रुपये जानेवारी २०२३ मध्ये मंजुरी मिळाली. या कामांमध्ये करूळ घाट मार्गाच्या ९.६ किलोमीटर रस्त्याचा समावेश होता.
करूळ घाटातून वाहतूक सुरू ठेवून या रस्त्यांची रुंदी वाढविणे, मोऱ्या व संरक्षण भिंतींची पुनर्बांधणी, गटारांचे बांधकामे धोक्याचे असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी हा घाटमार्ग वाहतुकीस बंद केला होता. सुरुवातीला तीन महिन्यांसाठी घाटमार्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर मुदत वाढविण्यात आली. जूनमध्ये घाटातील साडेसहा किलोमीटर एका मार्गिकेचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले होते. परंतु, दरडी कोसळण्याच्या शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक सुरू करण्यात परवानगी देण्यात आली नव्हती.
त्यानंतर पुन्हा घाटरस्त्यांचे उर्वरित कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात दिलेल्या अनेक तारखा उलटून गेल्यानंतर तब्बल १३ महिन्यांनी करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
हा घाटमार्ग वाहतुकीस बंद केल्यामुळे या मार्गावरील पर्यटकांची संख्या पूर्ण रोडावली होती. त्याचा सर्वात जास्त फटका पेट्रोलपंप, हॉटेल व्यावसायिकांना बसला. त्यामुळे या महामार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
सुक आणि शांतीवरील पुलांच्या कामांना वेग
करूळ घाटातील रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, तळेरे ते नाधवडे आणि एडगाव ते करूळ येथील काम युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोकीसरे बांधवाडी ते वैभववाडी शहर व एडगाव दरम्यानचे सुरू झालेले नसले तरी वैभववाडी शहराला जोडणाऱ्या सुक आणि शांतीवरील पुलांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरात तळेरे ते कोल्हापूर हा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे.