सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 21, 2022 06:07 PM2022-11-21T18:07:56+5:302022-11-21T18:08:37+5:30
या फुलांची जात अतिशय दुर्मीळ असून, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये त्याचे अस्तित्व पाहायला मिळते.
आंबोली : पश्चिम घाटामध्ये जैवविविधतादृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आंबोली व गेळे गावामध्ये सध्या तब्बल १६ ते १८ वर्षांनी फुलणाऱ्या आणि केवळ कडेकपाऱ्यावर उगवणाऱ्या एक प्रकारच्या कारवी झुडपाची फुले फुलली आहेत. याबाबत बेळगाव येथील वनस्पती अभ्यासक ऋतुजा कोलते - प्रभूखानोलकर यांनी सांगितले की, या फुलाला १६ ते १८ वर्षांनी फुलोरा येतो. उंच उंच कपाऱ्यांवर कड्यांवर या झुडपांचा अधिवास आहे.
कारवी या प्रकारामध्ये हे झुडुप ओळखले जाते. ही जात अतिशय दुर्मीळ असून, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये त्याचे अस्तित्व पाहायला मिळते. निळ्या जांभळ्या रंगाची ही फुले खूपच सुंदर असतात. उत्तर कर्नाटक, गोवा येथील दूध सागर, महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, आंबोली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येतही काही ठिकाणी या कारवीचे अस्तित्व आढळून आले आहे. या कारवीला जेव्हा फुलोरा येतो, त्यावेळी या कारवीची पाने गळून पडतात. तसेच ही कारवी अतिशय धोकादायक ठिकाणी उगवते म्हणजे सपाट अगदी सरळसोट कड्यावर या कारवीचा अधिवास आहे.
निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह
कारवीचे अनेक प्रकार आहेत. त्यातल्या काही कारवी सात वर्षांनी फुलतात, तर काही बारा वर्षांनी फुलतात. तर काही दरवर्षी फुलतात. त्यामुळे वनस्पती अभ्यासक तसेच निसर्गप्रेमींमध्ये ही कारवी बघण्यासाठी खूप उत्साह आहे. या झाडांचा फुलोरा आणखी दोन आठवडे पाहता येणार आहे. निसर्गातील या अद्भूत आणि खूपच दुर्मीळ अशा नजाऱ्याचा आनंद घेत असताना या फुलांना किंवा ही फुले पाहत असताना स्वतःला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती आंबोलीतील मलाबार नेचर कंझर्वेशन क्लबचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांनी केली आहे.