कातकरी बांधवांचा नगरपंचायतीवर मोर्चा

By admin | Published: August 9, 2016 10:06 PM2016-08-09T22:06:14+5:302016-08-09T23:55:47+5:30

शौचालय बांधणीची मागणी : अडीच महिन्यात व्यवस्था करण्याचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे आश्वासन

Katkari brothers marched on a panchayat | कातकरी बांधवांचा नगरपंचायतीवर मोर्चा

कातकरी बांधवांचा नगरपंचायतीवर मोर्चा

Next

कणकवली : ‘कुणी संडास देता का हो संडास’, ‘बिरसा मुंडा झिंदाबाद’, ‘घरदार नाय.. संडास तरी द्या’ अशा घोषणा देत कणकवलीतील कातकरी बांधवांनी मंगळवारी कणकवली नगरपंचायतीवर मोर्चा काढला. अखंड लोकमंच संस्थेच्यावतीने निघालेल्या या मोर्चात कातकरी महिला आणि मुलांचाही मोठा सहभाग होता. मोर्चेकरी कातकरी बांधवांनी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कातकरी बांधवांसाठी पुढील अडीच महिन्यात शौचालयाची व्यवस्था करू, असे आश्वासन नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर आणि बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर यांनी दिले.
दरम्यान, कातकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील स्वामी आर्ट स्टुडिओ येथे सकाळी १०.३० वाजता शहरातील कातकरी बांधव एकत्र आले. या सर्वांनी अखंड लोकमंच संस्थेच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.
कातकरी बांधवांनी केळी आणि साग झाडाच्या पानांवर ‘शौचालय द्या’ अशा घोषणा लिहून आणल्या होत्या. याखेरीज शौचालयास वापरली जाणारी ‘टमरेल’ सोबत आणली होती. मोर्चात शांताराम पवार, बबन पवार यांच्यासह अनेक कातकरी बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या. अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, शैलजा कदम, विनायक सापळे, मंजुनाथ पाचंगे आदी पदाधिकाऱ्यांनीही यात सहभाग घेतला. दुपारी ११.३० वाजता नगरपंचायतीसमोर हा मोर्चा आल्यानंतर कातकरी बांधवांनी शौचालय मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर शौचालयातील टमरेल घेऊन नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. चर्चा करण्यासाठी बोलावणे आल्यानंतर शांताराम पवार, बबन पवार, नामानंद मोडक, विनायक सापळे आदींनी नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर आणि बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर यांच्याशी नगराध्यक्ष दालनात चर्चा केली. तत्पूर्वी नगरपंचायत शौचालये देत नसल्याबद्दल कातकरी बांधवांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना रानफुले भेट दिली.
चर्चेच्या सुरुवातीला नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी शौचालयाबाबत, तुम्ही आम्हाला भेटलातच नाहीत, निवेदनही दिले नाही. जी निवेदने दिलीत ती मुख्याधिकाऱ्यांना दिलीत. त्यामुळे हा प्रश्नच आमच्यापर्यंत आला नसल्याचे स्पष्ट केले. तर उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी यापुढे निवेदने देताना ती प्रथम नगराध्यक्षांना द्या. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना त्याची एक प्रत द्या असे सांगितले.
शहरातील गणपती साना येथील कातकरी वस्तीमधील काहींना लांबचे दिसत नाही. तसेच सार्वजनिक शौचालये असलेली ठिकाणे दीड ते दोन किलोमीटर लांबीवर आहेत. एवढ्या लांब जाणे तसेच तेथे दररोज पैसे देऊन शौचालयात जाणे आम्हांला परवडणार नाही. त्यामुळे आम्हाला कातकरी वस्तीलगतच शौचालये बांधून द्या. तसेच शक्य झाले तर लोकवस्तीपासून दूर असलेल्या मुडेडोंगरी येथे जागा द्या. तेथे आम्ही घरे बांधू अशीही मागणी कातकरी बांधवांनी केली. उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी पुढील अडीच महिन्यात यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली. कातकरी वस्तीसाठी तीन आसनी फिरते शौचालय आम्ही अडीच महिन्यात उपलब्ध करून देऊ. सार्वजनिक शौचालय बांधून होईपर्यंत या फिरत्या शौचालयाचा वापर कातकरी बांधवांना करता येईल. मात्र त्याची स्वच्छताही त्यांनी राखावी असे पारकर यांनी सांगितले. अडीच महिन्यात ही व्यवस्था न केल्यास कातकरी बांधवांनी त्याबाबत आम्हाला जरूर विचारावे, असेही ते म्हणाले. यानंतर बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर यांनीही कातकरी बांधवांसाठी सार्वजनिक शौचालय कुठे उभे करता येईल याबाबत कातकरी बांधव आणि अखंड लोकमंच संस्था पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. (वार्ताहर)


नामानंद मोडक : शौचालयाची उपलब्धता होईपर्यंत दंड थांबवा
नामानंद मोडक म्हणाले, आम्ही शासनाचा अथवा नगरपंचायतीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढलेला नाही. तर आम्हांला शौचालये उपलब्ध करून द्या, या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन व इतर कामांसाठी जर दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असाल, तर कातकरी बांधवांच्या शौचालयासाठीदेखील काही रक्कम खर्च करा. त्यासाठी आवश्यक ते भूसंपादन आणि इतर कामे तळमळीने करा. एवढीच आमची कळकळीची मागणी आहे. गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक वर्षे कातकरी बांधव उघड्यावर शौचाला जात आहेत. त्यांना सातत्याने दंड केला जात आहे. शौचालयाची उपलब्ध होईपर्यंत दंड तरी थांबवा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.


आश्वासनांची पूर्तता नसल्याने मोर्चा
यावेळी नामानंद मोडक म्हणाले, कातकरी बांधवांना शौचालये नाहीत ही बाब चार महिन्यांपूर्वीच सांगितली होती. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह तहसीलदार, पोलिस अधिकारी यांची एकत्रित बैठक कातकरी वस्ती असलेल्या गणपती साना येथे झाली होती. त्यावेळीच शौचालयाची जाहीर मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तुम्ही शौचालयांबाबत आश्वासने दिली होती. त्याची पूर्तता न झाल्यानेच मोर्चा काढावा लागला आहे.

Web Title: Katkari brothers marched on a panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.