कातकरी समाज स्वीकारू लागला स्थानिक संस्कृती
By admin | Published: September 22, 2016 11:59 PM2016-09-22T23:59:13+5:302016-09-23T00:39:51+5:30
सामाजिक स्थित्यंतर : गणेशोत्सवात उत्साहाने सहभाग, प्रस्थापितही खूश
गुरुप्रसाद मांजरेकर --मिठबांव --भटकंती करणारा म्हणून परिचित असलेल्या कातकरी समाजातही स्थित्यंतर होत असून सामाजिक बदलासोबत हा समाज स्थानिक संस्कृती अंगीकारू लागला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सामाजिक स्थित्यंतराची अनुभूती येत असून प्रस्थापित समाजही त्यामुळे खुश दिसत आहे.
महाराष्ट्र हे राज्य विविधतेने नटलेले राज्य आहे. नैसर्गिक विविधतेबरोबरच भौगोलिक परिस्थितीनुसार समाजामध्येही विविधता आढळून येते. भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असणारा महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध आहे. भौतिक सुुविधांपासून स्थैर्य मिळवून भटकंती करणारे समाजही आता स्थिरावू लागले आहेत. हे समाज जेथे स्थिरावतात तेथील संस्कृतीही स्वीकारत आहेत. हे कातकरी समाजाने दाखवून दिले आहे. कोकणात गणेशोत्सव हा प्रमुख उत्सव समजला जातो. रंकापासून रावांपर्यंत आबालवृद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशोत्सवाला कोकणात वेगळेच स्थान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देताना त्याद्वारे सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाद्वारे सुरु केलेल्या सामाजिक सुधारणात कातकरी समाजही सहभागी झाला आहे. हे चित्र देवगड तालुक्यातील मुणगे या गावी गणेशोत्सवाच्या कालावधीत दिसले.
मुणगे-तळी येथील कातकरी वस्तीवर संतोष निकम यांच्यासह तेथे असलेल्या १२ कुटुंबांनी यावर्षी गणेशचतुर्थीदिवशी प्रथमच श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. येथे २१ दिवस गणेशोत्सव साजरा होत आहे. या २१ दिवसात बाप्पांचे नित्यपूजन होत आहे. त्या निमित्ताने आरती, नैवेद्य, प्रसाद, भजन हे कार्यक्रम होत आहेत. साहजिकच या वस्तीला एकप्रकारे महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रतिवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत मुणगे गावात मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, होत असल्याचे दिसून येते. या उत्सवाची प्रत्यक्ष अनुभूती हा समाज घेत आहे. मुणगे गावातील भजन मंडळेही या गणेश चरणी सेवा अर्पण करीत आहेत. या उत्सवाचे पावित्र्य पाळून समाजातील नागरिकांनी श्री भगवती हायस्कूल व नजीकच्या कारिवणेवाडी शाळेत आपली मुले पाठवून विद्येच्या या देवतेचे पूजन करण्यात प्रारंभ केला आहे.
जागा उपलब्ध झाल्याने स्थैर्य
कातकरी समाज हा भटकंती करणारा समाज म्हणून ओळखला जातो. जंगलात मिळणारी कंदमुळे, मांस यावरच हा समाज आजपर्यंत आपली गुजराण करत आला आहे. मुणगे गावात मोठ्या प्रमाणावर कातकरी बांधव वास्तव्यास आहेत. चरितार्थासाठी शेतमजुरी व इतर छोेटीमोठी कामे करण्यासाठी विविध ठिकाणी विखुरला होता. त्यांना मुणगे-तळी येथे शासकीय जागा उपलब्ध करून दिल्याने निकम कुटुंबिय याठिकाणी वसती करून आहे. नारळाची झापे व गवताच्या सहाय्याने साकारलेली कातकरी बांधवांची घरे, पाण्यासाठी तळी व शासनाकडून उपलब्ध करुन विंधन विहीर वीजेसाठी सौर ऊर्जा दिव्यांचा उजेड हे या वस्तीचे ऐश्वर्य होय.