चिपळुणात मोजणीचे काम रोखले
By admin | Published: May 28, 2015 12:50 AM2015-05-28T00:50:22+5:302015-05-28T00:56:14+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर अखेर माघारी फिरण्याची वेळ.
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाग नाका तसेच शहरातील न्यायालयासमोरील रस्त्याच्या मोजणीचे काम आज (बुधवारी) सुरु करण्यात आले. मात्र, मोजणीच्या कामाबाबत संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय हे काम होऊ देणार नाही, अशी भूमिका परिसरातील रहिवाशांनी घेतल्याने हे काम थांबवण्यात आले आहे.राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी शहरातील विविध भागात आज मोजणीचे काम सुरु केले होते. हा प्रकार नगरसेवक शशिकांत मोदी, मुश्ताक बेबल, सरोज नेने, सरफराज गोठे, बापू चव्हाण, आरपीआयचे शहराध्यक्ष मंगेश जाधव, राजू कानडे, सुहास मोरे, काका महाकाळ, काका नाडकर, संजीव नायर यांना समजल्यानंतर ३० ते ३५ रहिवासी या ठिकाणी दाखल झाले. पाग नाका येथून मोजणीचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र, सकाळी १०.४५ वाजता न्यायालय आवारासमोरील रस्त्याच्या मोजणीचे काम सुरु होते. मात्र, हे काम यावेळी रोखण्यात आले.
मुंबई - गोवा महामार्गासाठी जागा किती घेतली जाणार? संबंधितांना मोबदला किती दिला जाणार? याचा उलगडा होत नाही तोपर्यंत ही मोजणी होऊ देणार नाही, असा निर्धार उपस्थितांनी घेतला. यासंदर्भात प्रांताधिकारी हजारे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. रहिवाशांच्या काही समस्या व अटी जाणून घेण्यासाठी प्रांताधिकारी हजारे यांनी दि. २९ रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मोजणीच्या कामासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले. (वार्ताहर)
प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय रस्त्याच्या कामाबाबत मोजणी न करण्याचा रहिवाशांंचा निर्धार.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर अखेर माघारी फिरण्याची वेळ.