केळशीत अडीच हजार लीटर दारू रसायन जप्त
By Admin | Published: June 28, 2015 10:36 PM2015-06-28T22:36:36+5:302015-06-29T00:27:23+5:30
दापोली पोलिसांनी दारूधंदेवाल्यांवर आता धडक कारवाईला सुरूवात केली आहे.
आंजर्ले : सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली दापोली पोलिसांनी धडक कारवाई करून केळशीत अडीच हजार लीटर दारू तयार करण्यासाठी जमा करण्यात आलेले रसायन जप्त केले. या केलेल्या धडक कारवाईने केळशी परिसरात बेकायदेशीर दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत लोकमतने आवाज उठवला होता.
दापोली पोलिसांनी दारूधंदेवाल्यांवर आता धडक कारवाईला सुरूवात केली आहे. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रहाटे, हवालदार अनिल चांदणे, विष्णू गिम्हवणेकर, संदेश गुजर यांनी केळशी मधला मोहल्ला येथे धाड टाकली. या धाडीत गावठी दारू तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेले दोन हजार सहाशे लीटर रसायन सापडले. हे रसायन सहजासहजी आढळू नये, म्हणून जमिनीखाली पिंपांमध्ये भरून पुरून ठेवण्यात आले होते. हे रसायन पोलिसांनी नष्ट करून टाकले. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दिनानाथ मांदविलकर याच्याकडे एक हजार नव्वद लीटर रसायन सापडले. त्याची अंदाजे किंमत २६ हजार ६०० रुपये आहे, तर दुसरा आरोपी सुरेश खोत याच्याकडे ९९० लीटर दारूचे रसायन सापडले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)