फिशमिलविरोधात केळूसकर आक्रमक
By admin | Published: October 26, 2016 10:43 PM2016-10-26T22:43:52+5:302016-10-26T22:43:52+5:30
कंपनीला दिलेला नाहरकत दाखला रद्द : ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांना बसविले जमिनीवर
वेंगुर्ले : केळूस ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आकाश फिशमिल अँड फिश आॅईल प्रा. लि. या कंपनीला ना हरकत दाखला देऊ नये, असा ठराव केळूस ग्रामसभेत घेण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीने आकाश फिशमिल अँड फिश आॅईल प्रा. लि. या कंपनीला दिलेला नाहरकत दाखला ग्रामसभेने रद्द केला. या विशेष ग्रामसभेत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना चक्क खुर्चीवरून खाली उतरवून ग्रामसभेत ग्रामस्थांसोबत खाली बसविले.
वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावात ग्रामपंचायत हद्दीत एका उद्योजकाने ‘आकाश फिशमिल’ हा मत्स्य प्रक्रिया उद्योग सुरू केला असून, या कंपनीला केळूस ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला दिला होता. मात्र, कंपनी प्रशासनाने मत्स्य प्रक्रिया उद्योगातून निघणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था नीट न केल्याने परिसरातील लोकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. याबाबत ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रशासनाशी बोलून त्याबाबत कल्पना दिली होती. वारंवार कल्पना देऊनसुद्धा कंपनी प्रशासनाने त्याची योग्य दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, ग्रामपंचायतीनेही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. वारंवार कंपनीकडे तसेच ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कंपनी व ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आरोग्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे ठरविले होते.
त्यानुसार १८ आॅक्टोबर रोजी या प्रश्नावर दत्तात्रय ऊर्फ दादा राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा झाली. ही ग्रामसभा दुपारी असल्यामुळे व सध्या शेतीच्या कामांची घाईगडबड असल्यामुळे ३० ते ४० ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी केळूस ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विकास केळुसकर यांनी सभेची गणपूर्ती पूर्ण होत नसल्यामुळे सभा बरखास्त करण्यात येईल असे सांगितले. यामुळे उपस्थित ग्रामस्थ आक्रमक बनले.
ग्रामसेवकांच्या या कायदेशीर असहकार्यावर उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसेवक, कंपनी प्रतिनिधी तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य गंभीर प्रश्नावर आयोजित केलेली विशेष ग्रामसभा बरखास्त करीत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी १५ ते २० मिनिटांत गावातील इतर ग्रामस्थांना याची कल्पना देऊन त्यांना ग्रामसभेच्या ठिकाणी बोलावून घेतले. परिणामी सभेसाठी लागणारी गणपूर्ती झाली.
ग्रामसेवक, सरपंच विकास केळुसकर, सरपंच स्मिता राऊळ, उपसरपंच योगेश शेट्ये तसेच सदस्य ग्रामसभेत असहकार्याचे धोरण घेत असल्याने २०० ते २५० ग्रामस्थांनी याबाबत संबंधितांना जाब विचारला. ‘आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे, त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक आहात. त्यामुळे तुम्ही ग्रामस्थांसोबत राहत नसाल, तर आताच्या आता खुर्च्या खाली करा,’ असे ग्रामस्थांनी त्यांना सुनावले.
यामुळे ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंच, तसेच सदस्य बसलेल्या खुर्च्या काढून घेऊन त्या
सभागृहाबाहेर नेऊन ठेवण्यात आल्या. यावेळी या सर्वांनाच ग्रामस्थांसोबत जमिनीवर बसवून सभेचे कामकाज चालू केले. ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कंपनी प्रतिनिधीसह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्यांची चांगलीच तारांबळ
उडाली.
ग्रामस्थांनी सदर कंपनीकडून सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था केली नसल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कंपनीस दिलेला नाहरकत दाखला रद्द करण्याचा ठराव घेतला.
अखेर ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी ग्रामस्थांसमोर नमते घेत ठराव मान्य केला.
केळूस ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ग्रामसेवक विकास केळुसकर, सरपंच स्मिता राऊळ, उपसरपंच योगेश शेट्ये सदस्य यांना जमिनीवर बसवून ही ग्रामसभा घेण्यात आली. (वार्ताहर)
अन् केली जुळवाजुळव
शेतीच्या कामांमुळे सभेला ४० ग्रामस्थांची उपस्थिती होती. गणपूर्ती होत नसल्याने ग्रामसेवकाने सभा बरखास्तीचा घाट घातला. मात्र, ग्रामस्थांनी त्वरित नागरिकांची जुळवाजुळव करत गणपूर्ती केली.
अन् सभेचे कामकाज जमिनीवरून
ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या खुर्च्या काढून घेऊन त्या सभागृहाबाहेर नेऊन ठेवल्या व त्यांना ग्रामस्थांसोबत जमिनीवर बसवून सभेचे कामकाज चालू केले.