केसरकर जनतेला उल्लू बनवताहेत, परशुराम उपरकरांचे टीकास्त्र
By अनंत खं.जाधव | Published: October 10, 2023 04:20 PM2023-10-10T16:20:00+5:302023-10-10T16:20:38+5:30
त्यांच्याकडे कोणती जादू, सहा महिन्यात जिल्ह्याचा कायापालट कसा करणार?
सावंतवाडी : मंत्री दिपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पाच वर्षे पालकमंत्री होते. तेव्हा त्यांना काही जमले नाही ते सहा महिन्यात जिल्ह्याचा कायापालट कसा काय करणार,कोणती जादू त्यांच्याकडे आहे. कि फक्त उल्लू बनविण्याचा कारखाना आहे, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना अभय देसाई उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, पालकमंत्री हे केवळ आपले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यात येतात. जिल्ह्यातील प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही. विशेष म्हणजे स्वतःच्या केसरी येथील घरी जाणारा रस्ता सुध्दा ते करू शकले नाहीत अशी टीका उपरकर यांनी केली.
लोकांची दिखाभूल
सहा महिन्यात जिल्ह्याचा विकास झालेला दिसेल असे सांगून केसरकर हे लोकांची दिखाभूल करीत आहेत. त्यांना पाच वर्षे पालकमंत्री असताना काही करता आले नाही तर ते आता सहा महिन्यात काय करणार? असा सवाल करीत त्यांनी मागच्यावेळी जाहीर केलेले ॲम्युझमेट पार्क, चष्म्याचा कारखाना, रोप वे, ट्रॉय ट्रेन आदी प्रकल्प कुठे? रोजगार देणार होता त्याचे काय झाले? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. सावंतवाडी मतदार संघातील लोकांना फक्त गोड बोलून त्यांनी उल्लू बनविण्याचे काम केले आहे. मात्र येथील जनता त्यांना काही झाले तरी माफ करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक पेडणेकर, प्रणित टाळकर, विशाल गावकर, नितीन गावकर, ओंकार गावकर, अतुल गावकर, ज्ञानेश्वर नाईक आदींनी मनसेत प्रवेश केला. उपरकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.