केसरकरांनी आधी स्वत:ची पत तपासावी- संजू परब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 03:33 PM2017-12-03T15:33:41+5:302017-12-03T15:33:52+5:30
सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री राणे यांची उंची तपासण्यापेक्षा पहिल्यांदा स्वत:ची राजकारणातील उंची तपासावी आणि नंतर राणेंवर टीका करावी.
सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री राणे यांची उंची तपासण्यापेक्षा पहिल्यांदा स्वत:ची राजकारणातील उंची तपासावी आणि नंतर राणेंवर टीका करावी. स्वत:च्या मतदारसंघात स्थानिक निवडणुकांत जिंकून येत नाही आणि मातोश्रीच्या शाबासकीसाठी राणेंवर टीका करतात, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी लगावला. सावंतवाडी तालुक्यातील खुनांचा तपास पहिला लावा आणि नंतर जिल्ह्यातील खुनांचे तपास लावा, असा सल्लाही परब यांनी यावेळी दिला.
स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक शनिवारी पार पडली. त्यानंतर तालुकाध्यक्ष संजू परब बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, सभापती रवी मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, उपसभापती निकिता सावंत, सत्यवान बांदेकर, लहू वारंग, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
परब म्हणाले, मंत्री केसरकर यांनी शासकीय रुग्णालयात एक महिन्यात वैद्यकीय अधिकारी भरू असे सांगितले आहे. जर खरोखरच त्यांनी वैद्यकीय अधिका-याची नेमणूक केली तर आम्ही त्यांचे स्वागतच करून त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊ, असे सांगितले. अन्यथा आतापर्यंत जनतेची फसवणूक केली तशी यापुढेही करू नये. मंत्री केसरकर यांना जिल्ह्याच्या विकासापेक्षा राणेंवर टीका महत्त्वाची वाटत आहे. ते टीका करून स्वत:कडे लक्ष वेधून घेत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अंकुश राणे, रमेश गोवेकर यांचा तपास लावणार असे केसरकर सांगत आहेत. मग त्यांना तीन वर्षे कोणी थांबवले होते, असा सवाल करीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत अनेक खून झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील तिहेरी हत्याकांड, कारिवडेतील सुहानी माळकर, सावंतवाडीतील आनंद गुजराती प्रकरण अशी प्रकरणे तपासाविना आहेत. त्यांच्या कुटुंबांना तरी न्याय द्या. केसरकर हे स्वत:च्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही ते इतरांना न्याय काय देणार, असा सवाल उपस्थित केला आहे.
नगरपालिका निवडणुकीत काठावर पास
नगरपालिका निवडणुकीत केसरकर काठावर पास झाले. तर पंचायत समितीत पूर्णपणे धुळ चारली. जिल्हा परिषदेमध्येही हातावर मोजण्या एवढ्याही जागा येऊ शकल्या नाहीत. याचा अर्थ राजकारणात कोणाची पत कोठे आहे ते सर्वांना कळते. ज्यांना स्वत:चा मतदारसंघ सांभाळता येत नाही तेच राणेंची किंमत काढत आहेत. राणेंवर टीका केली, तर ह्यमातोश्रीह्ण आपणास शाबासकी देते, म्हणूनच ही टीका सुरू आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.