केसरकर सावंतवाडीतच राणेंकडून ‘चेकमेट’

By admin | Published: August 31, 2015 12:25 AM2015-08-31T00:25:10+5:302015-08-31T00:25:10+5:30

कारण-राजकारण : अपात्रतेच्या टांगत्या तलवारीने सदस्य घाबरले

Kesarkar's 'checkmate' from Ravan in Sawantwadi | केसरकर सावंतवाडीतच राणेंकडून ‘चेकमेट’

केसरकर सावंतवाडीतच राणेंकडून ‘चेकमेट’

Next

अनंत जाधव-सावंतवाडी   काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या ताब्यातील पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आणून त्यांना चेकमेट करण्याची स्वप्न बघणारे पालकमंत्री दीपक केसरकर स्वत:च चेकमेट झाले आहेत. ज्या चार सदस्यांना ‘मातोश्री’ची वारी घडवून आणली होती, ते चारही सदस्य आता पुन्हा अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे काँग्रेसच्या गोटात दाखल होत पंचायत समितीवरचा काँग्रेस झेंडा शाबूत ठेवला आहे. मात्र, शिवसेनेच्या एका गटाने विरोध केला नसता, तर कदाचित हे चारही सदस्य शिवसेनेत गेले असते आणि अचानक पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले असते तर शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असती. त्यामुळे या चौघांनाही विरोध करणारा शिवसेनेतील एक गट आपला विजयच मानत आहे.
चार महिन्यांपूर्वी सावंतवाडी पंचायत समितीत बदलाचे वारे वाहू लागले होते. काँग्रेसच्या हातातून पंचायत समितीची सत्ता जाईल आणि पालकमंत्र्यांच्या तालुक्यात काँग्रेस नेते नारायण राणे चेकमेट होतील, असे वाटत होते. पण घडले उलटेच! पालकमंत्र्यांना त्यांच्याच मतदारसंघात नारायण राणे यांनी चेकमेट करीत त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला. काँग्रेसचे तीन सदस्य महेश सारंग, नारायण राणे व सुनयना कासकर, तर पूर्वीचे शिवसेनेचे व नंतर काँग्रेसला साथ देणारे विनायक दळवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवशाही गट स्थापन करण्यात यावा, यासाठी अर्जही केला होता. पण याला काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडेच आव्हान दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दावे-प्रतिदावे चालले होते.
दुसरीकडे काँग्रेसमधून आलेल्या चौघाही सदस्यांना शिवसेनेमध्ये हवे तसे स्थान मिळत नव्हते. एकंदरीत त्यांच्या पक्ष प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या काही समर्थकांनी या चौघाही सदस्यांना ‘मातोश्री’पर्यंत नेले खरे; पण नंतर त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र उमटल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशावर कोणीच भाष्य केले नाही. पण शिवसेनेचा एक गट या चौघांच्याही पक्षप्रवेशाला तीव्र विरोध करीत होता. त्यांनी या चौघांची कुंडलीच पक्ष नेतृत्त्वाकडे पोहोचवली होती, तर दुसरा गट या चौघाही सदस्यांच्या बाजूचा होता. सेनेतील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे या सदस्यांना धड शिवसेनेत असल्याचे वाटत नव्हते.
शिवशाही गट स्थापन करून शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या चार सदस्यांना कायदेशीर प्रक्रियेत अडकवण्यास काँग्रेसने सुरूवात केली होती. नवीन कायद्याप्रमाणे हे चारही सदस्य एक तृतीयांश सदस्य आपल्या बरोबर घेऊन येऊ शकत नसल्याने अपात्र होणार होते. याची कुणकुण या सदस्यांना लागताच त्यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांना साद घालत पुन्हा काँग्रेसवासी झाले. त्यामुळे पंचायत समितीवरचे राजकीय स्थित्यंत्तर वाचले आणि पुन्हा पालकमंत्र्यांना त्यांच्याच मतदारसंघात ‘चेकमेट’ करण्यात यश आले.
दुसरीकडे या चार सदस्यांना शिवसेनेने प्रवेश दिला असता, तर अल्पवधीतच शिवसेनेच्या नेतृत्त्वाची नाचक्कीच झाली असती. कारण काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या ताब्यातील पंचायत समिती हिसकावून घेतली, असा जयघोष सुरू करण्यात चार सदस्यांचे समर्थक पुढे होते. अपात्रतेच्या कारवाईमुळे हे सदस्य पुन्हा काँग्रेसवासी झाले असते. मग हा जयघोष करणारे उघडे पडणार होते.


‘मातोश्री’ वारी केलेले सदस्य काँग्रेसच्या आश्रयाला.
सदस्यांना विरोध करणारे आनंदात.
चौघांनाही विरोध करणारा शिवसेनेतील गट मानतोय आपलाच विजय.
नारायण राणे यांना घातली
साद.

Web Title: Kesarkar's 'checkmate' from Ravan in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.