केसरकरांचे गोडवे भाजपात नाराजी

By admin | Published: May 27, 2014 01:16 AM2014-05-27T01:16:05+5:302014-05-27T01:18:04+5:30

श्रेयवादातून शिवसेना-भाजपात कुरबुरी : विनायक राऊत भारावले

Kesarkar's Godavati BJP resigns | केसरकरांचे गोडवे भाजपात नाराजी

केसरकरांचे गोडवे भाजपात नाराजी

Next

  कणकवली : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला रत्नागिरी-सिंधुदुर्गातून मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष अद्याप ओसरलेला नाही. तोपर्यंत श्रेयवादातून शिवसेना-भाजपात कुरबुरी सुरू झाली आहे. खासदार राऊत यांनी आमदार केसरकरांना पालकमंत्री जाहीर करून टाकल्याने भाजपाच्या गोटात नाराजी पसरली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला भाजपाचे पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने ही वादाची किनार गडदपणे दिसून आली. या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातून शिवसेना आणि भाजपाने एकदिलाने काम केले. मोदी लाटेसोबत या एकत्रित कामाचेही चीज झाले. त्याचबरोबर सावंतवाडीतून आमदार दीपक केसरकर यांनी ऐनवेळी दिलेला मदतीचा हात मोलाचा ठरला. खासदार राऊत यांनी विजयी होऊन सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर भाजपाने केलेल्या मदतीची आठवण करण्यापेक्षा आमदार केसरकर यांच्या मदतीने भारावून जात चक्क पुढील पालकमंत्री केसरकर होणार असल्याचे जाहीर करून टाकले. मात्र, केंद्रात स्वबळावर सत्तेत आलेल्या भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांच्या कार्यकर्त्यांना हे वक्तव्य तितकेसे रूचलेले नाही. आमदार जठार यांच्याकडे भावी पालकमंत्री म्हणून पाहत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी मदतीचा हात दिला असला तरी आम्हीही खूप घाम गाळलाय असे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सावंतवाडी मतदारसंघावर भाजपाचा दावा सांगितला. कोकणातील सहा मतदारसंघापैकी चार शिवसेनेकडे आणि भाजपाकडील दोन विधानसभा मतदारसंघ हे गणित आता बदलून तीन-तीन असे करावे, अशी काळसेकर यांची मागणी आहे. बदलेल्या स्थितीनुसार सावंतवाडी मतदारसंघ भाजपाकडे हवा असे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने राज्यात अमाप यश मिळवल्याने सिंधुदुर्गातील शिवसैनिकही जोरावर आहेत. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेच्या वाढलेल्या ताकदीने नेमकी ताकद जास्त कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रात भाजपाच्या नरेंद्र मोदींना ताकद दिली पाहिजे तर स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून जाणे आवश्यक होते. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी जीवाचे रान केले. मात्र, आता गरज सरो वैद्य मरो असा प्रकार काही ठिकाणी दिसून येत आहे. भाजपाची नाराजी कालच्या उदध्व ठाकरेंच्या दौर्‍यात स्पष्टपणे दिसून आली. स्थानिक आमदार प्रमोद जठार जिल्ह्यात असतानाही ठाकरेंच्या स्वागताला दिसलेले नाहीत. जिल्ह्यांतर्गत सेना-भाजपातील ही नाराजी सोडविण्यासाठी अद्याप कोणी नेता पुढे आलेला नाही. ही नाराजी आताच न मिटवल्यास मोदी लाटेचा प्रभाव विरून आगामी विधानसभा निवडणुकीत युतीला फटका बसण्याचीच जास्त शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kesarkar's Godavati BJP resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.