केसरकर यांचा उदय नारायण राणे यांच्यामुळेच! राजन तेली यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:42 PM2019-09-02T15:42:33+5:302019-09-02T16:31:07+5:30
तुमचा उदय हा राणेंमुळे झाला आहे, अशी खोचक टीका माजी आमदार राजन तेली यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर सावंतवाडीत केली.
सावंतवाडी : आम्ही मिठाला जागणारी माणसे असल्यानेच आमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आतापर्यंत विश्वासघातच करत आला आहात. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तुम्हांला नगराध्यक्षपदी बसविण्यापासून केलेल्या मदतीचा मी साक्षीदार असून, मुळातच तुमचा उदय हा राणेंमुळे झाला आहे, अशी खोचक टीका माजी आमदार राजन तेली यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर सावंतवाडीत केली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, मनोज नाईक, प्रथमेश तेली उपस्थित होते.
तेली म्हणाले, नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार असून, तसे काम करणार आहे. मात्र, मंत्री केसरकर यांना आम्हांला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना भाजपचे प्रवक्तेपद दिले गेले नाही. ते सेनेचे मंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला कितपत फायदा झाला हे त्यांनी आजमावून घ्यावे. आजपर्यंत ते कोणाच्या मिठाला जागले नसून, नेहमी विश्वासघाताचे राजकारण करीत आले.
ते पुढे म्हणाले, गेल्यावर्षी चिपी विमानतळावर विमानातून गणपती उतरवून विमानतळाचे उद्घाटन केले हा प्रकार चुकीचा होता. आज त्या ठिकाणी विमान सेवा सुरू नाही, हे अपयश पालकमंत्र्यांचे आहे. त्यामुळे शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत नजीकच्या कर्ली खाडीत जलवाहतुकीसाठी टर्मिनस केल्यास व गोव्यातील समुद्र किनारा याला सोडल्यास येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून चिपी विमानतळ चांगले चालू शकते.
यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शासनाने नव्याने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली असून योजनेच्या मिळणाऱ्या पैशातूनच जर शेतकऱ्याने हप्त्याचे पैसे त्या ठिकाणी भरल्यास वयाच्या ६० व्या वर्षापासून शेतकऱ्याला महिना तीन हजार रुपये पेन्शन आहे. या योजनेचा लाभ ४० वयोगटापर्यंत शेतकऱ्यांना घेता येणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळवून देणार
शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फॉर्मवर बँकेचा आयएफसी कोड व माहिती बरोबर न भरल्याने जवळपास जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के लोकांना योजनेचा थेट फायदा झाला नाही. त्यामुळे ही माहिती योग्यरित्या भरून नजीकच्या तहसीलदार कार्यालयात किंवा भाजप कार्यालयात दिल्यास एकत्रित पुढे त्याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यात येईल. तसेच ज्यांनी या योजनेसाठी प्रयत्न केले नाहीत त्यांनी सुद्धा संबंधित फॉर्म भरल्यास त्यांना पैसे मिळवून देण्याची ग्वाही राजन तेली यांनी यावेळी दिली.