खेड - दापोली राष्ट्रवादीकडे ?.. राजापूर काँग्रेसकडे : गुहागर महायुतीत विघ्न
By admin | Published: August 29, 2014 10:13 PM2014-08-29T22:13:17+5:302014-08-29T23:11:20+5:30
गुहागरवरून वादंग होण्याची शक्यता
खाडीपट्टा : विधानसभा निवडणुकीला दोन महिने अवधी असतानाच उमेदवार निवड प्रतिक्रियेला चांगलीच गती आली आहे. पक्षांतर्गत जागा वाटप व उमेदवार निवड प्रक्रिया येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असे संकेत मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ राजापूर मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसकडे राहणार असून, दापोली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला जाणार आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी जिल्ह्यात एकत्र निवडणुका लढवत असून, उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस जागा वाटपाच्या अदलाबदलीत जिल्ह्यातील एक जागा काँग्रेसकडून मिळविण्यात यशस्वी झाली आहे. दापोली हा परंपरागत काँग्रेसकडे असलेला मतदार संघ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जिल्ह्यात केवळ राजापूर मतदार संघातून लढताना दिसणार आहे.
जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर व दापोली हे पाच मतदारसंघ आहेत. यापैकी सध्या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी, तर तीन मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. दरम्यान, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात दापोली मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
जिल्ह्यात शिवसेना - भाजप युतीकडून राजापूर, चिपळूण, दापोली व गुहागर हे मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असून, रत्नागिरी मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला आहे. महायुतीमध्ये गुहागर मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपाला मिळावा, असा आग्रह धरला जात असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मागणी फेटाळल्याचे समजते. मागील निवडणुकीत गुहागर मतदारसंघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती, तर अपक्ष लढलेले विनय नातू तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. ही जागा शिवसेना सोडण्यास तयार नाही, अशी माहिती पुढे येत आहे.
या घडामोडींमुळे जिल्ह्यात विशेषत: गुहागर मतदार संघात राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
गुहागरवरून वादंग होण्याची शक्यता
गत विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदार संघ शिवसेनेला देण्यात आला. त्यामुळे तत्कालीन आमदार विनय नातू यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यात ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र त्यांनी पुन्हा एकदा प्रचाराला जोमाने सुरूवात केली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही त्यांची पाठराखण केली आहे. आता त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.