खैदा-कातवड येथील युवकाचा काविळीच्या आजाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:26 AM2019-11-05T11:26:49+5:302019-11-05T11:28:51+5:30
मालवण तालुक्यातील खैदा-कातवड येथील संतोष उर्फ बाबू शिवराम परब (३८) यांचा काविळीच्या आजाराने शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. परब यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मालवण : तालुक्यातील खैदा-कातवड येथील संतोष उर्फ बाबू शिवराम परब (३८) यांचा काविळीच्या आजाराने शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. परब यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मृत परब यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी कुटुंबीयांना आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वखर्चाने आणावे लागल्याने रुग्णालयाच्या काराभरावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली.
खैदा-कातवड येथील संतोष परब काही दिवस आजारी होते. शनिवारी सकाळी परब हे मालवण येथील खासगी रुग्णालयात उपचार करून घरी गेले. सायंकाळी उशिरापर्यंत ते उठले नसल्याने त्यांच्या पत्नीने पाहिले व शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी संतोष यांना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
परब यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन बहिणी, भावोजी असा परिवार आहे. परब हे मालवणात गवंडी काम करून उदरनिर्वाह करायचे. परब यांच्या मृतदेहाचे रविवारी विच्छेदन करण्यात येणार होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील हे सुटीवर असल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला.
याबाबत नातेवाईक व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्वखर्चाने आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. जाधव यांना रिक्षातून आणले. त्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर पुन्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना नातेवाईकांनी स्वखर्चाने आचरा येथे पाठविले.