गुप्तधन काढून देणाऱ्या भामट्याचे अपहरण
By admin | Published: August 20, 2015 11:09 PM2015-08-20T23:09:15+5:302015-08-20T23:09:15+5:30
भामटा रत्नागिरी जिल्ह्यातील : दोघांना इस्लामपुरात अटक
इस्लामपूर : सावर्डे-चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भोंदू भामट्याचे अपहरण केल्याप्रकरणी मानपाडा (मुंबई) पोलिसांनी इस्लामपूरजवळच्या नरसिंहपूर आणि साखराळे येथून दोघांना ताब्यात घेतले. अपहरणाची ही घटना १५ आॅगस्ट रोजी मानपाडा पोलिसांच्या हद्दीत घडली होती. गुप्तधन काढून देण्यासाठी ३0 लाख रुपये घेतल्याच्या रागातून हे अपहरण झाले आहे.वैभव पाटणकर (रा. रत्नागिरी) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. त्याचे अपहरण करणाऱ्या टोळीतील युवराज कदम (नरसिंहपूर) व अमित चव्हाण (साखराळे) या दोघांना मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश पाटील यांनी कारवाई करून ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील आणखी सहाजण फरार झाले आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, वैभव पाटणकर आणि दीपक पाटणकर (दोघे रा. रत्नागिरी) या भोंदूंनी राजेंद्र साळुंखे (नरसिंहपूर) व अजित चव्हाण (रत्नागिरी) यांच्याकडून गुप्तधन काढून देण्यासाठी ३0 लाख रुपये घेतले होते; पण पाटणकर यांच्याकडून त्यासंबंधी काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच साळुंखे व चव्हाण यांनी पैसे परत मिळविण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे दोघेही पाटणकर परागंदा झाले होते.
काही दिवसांनी वैभव पाटणकर हा मानपाडा हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यावर राजेंद्र साळुंखे, अजित चव्हाण, युवराज कदम, अमित चव्हाण यांच्यासह रत्नागिरी परिसरातील चौघे अनोळखी अशांनी मिळून वैभव पाटणकरचे १५ आॅगस्ट रोजी अपहरण केले. तेथून त्याला पनवेल, पुणे, उंब्रज मार्गे कुंभार्ली घाटातून पुढे एका निर्जनस्थळी असणाऱ्या बंगल्यावर नेऊन, कोंडून ठेवून मारहाण केली.
दरम्यान, याबाबतचा गुन्हा दाखल होताच यातील संशयितांच्या मोबाईल लोकेशनवरून मानपाडा पोलिसांनी त्यांचा माग काढला. अपहरणानंतर युवराज कदम व अमित चव्हाण हे कऱ्हाडमधून आपापल्या गावी आले होते. बुधवारी रात्री मानपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलेश पाटील यांनी दोघांना ताब्यात घेतले.