तारकर्ली जेटी येथे अज्ञातांनी मारले खड्डे, शासकीय मालमत्तेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 07:48 PM2019-05-15T19:48:25+5:302019-05-15T19:49:56+5:30
मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे वर्षभरापूर्वी बंदर विभागाच्यावतीने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुसज्ज जेटीवर अज्ञातांनी खड्डे मारले आहेत. याशिवाय काही ठिकाणी अतिक्रमणही करण्यात आले आहे. मात्र, बंदर विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे बंदर विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांविरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.
मालवण : तालुक्यातील तारकर्ली येथे वर्षभरापूर्वी बंदर विभागाच्यावतीने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुसज्ज जेटीवर अज्ञातांनी खड्डे मारले आहेत. याशिवाय काही ठिकाणी अतिक्रमणही करण्यात आले आहे. मात्र, बंदर विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे बंदर विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांविरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.
गेल्यावर्षी तारकर्ली बंदर येथे बंदर विभागाच्यावतीने लाखो रुपये खर्चून सुसज्ज अशी जेटी साकारण्यात आली. मात्र, वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच या जेटीवर ठिकठिकाणी अज्ञात व्यक्तींनी खड्डे मारले असल्याचे दिसून आले आहे. या खड्ड्यांमुळे सुसज्ज जेटीची नासधूस झाली आहे. जेटीचे अज्ञातांकडून नुकसान करण्यात आल्यानंतरही बंदर विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून संबंधितांविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे बंदर विभागाने हे खड्डे कोणी व का मारले याचा शोध घेत संबंधितांविरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करणे महत्त्वाचे बनले आहे.
फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
या बंदर जेटीलगतच पाऊल मार्ग (फूटपाथ) बनविण्यात आला आहे. या मार्गावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. जर पाऊल मार्गावरच अतिक्रमण होत असेल तर त्या मार्गाचा उपयोगच काय? असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. त्यामुळे बंदर विभागाने याकडेही लक्ष पुरवित या मार्गावर झालेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.