मेहरबानी नको, मराठा आरक्षण हवेच :
By admin | Published: October 7, 2016 11:25 PM2016-10-07T23:25:10+5:302016-10-07T23:49:47+5:30
नीलेश राणे
रत्नागिरी : आरक्षणाच्या हक्कासाठी मराठे आता पेटून उठले आहेत. ते ऐकणार नाहीत. सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. मेहरबानी नको, आरक्षणाचा हक्क मराठा समाजाला हवा आहे. तो द्यावाच लागेल, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी शुक्रवारी येथील कॉँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.
सध्या राज्यभरात मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये येत्या १६ आॅक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा होणार आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी आपली भूमिका मांडली आणि सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, असे ठणकावले.
डिसेंबर २०१६ मध्ये होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी आताच सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक काँग्रेस कार्यकर्त्यांचे अर्ज स्वीकारणे व मुलाखती घेण्याचे काम शुक्रवारपासून काँग्रेस भवनमध्ये सुरू केले आहे. या प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी राणे रत्नागिरीत आले होते. पहिल्याच दिवशी अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नगरपरिषद निवडणुकांसाठी जिल्ह्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडी व्हावी, यासाठी चर्चा सुरू आहे. आघाडी न झाल्यास नगरपरिषदेच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याची तयारीही कॉँग्रेसने केली आहे. येत्या सात दिवसांत नगरपरिषदेसाठी इच्छुकांना उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. याच काळात त्यांच्या मुलाखती होणार आहेत. यावेळी रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पारकर, तेली पक्षबदलू
जो कोणी बोलावेल त्या पक्षात संदेश पारकर जातात. आम्ही त्यांना महामंडळ मिळवून दिले. मात्र, सत्ता बदलली तसे पारकरही बदलले. ‘सत्ता तेथे पारकर’ असे समीकरण झाले आहे. हे लोक गृहीत धरतात. लोक यांना कसा मान देणार ? भारतीय जनता पार्टीत राजन तेलींची अवस्था बिकट आहे. पारकर आणि तेली या पक्ष बदलंूना जनताच धडा शिकविल, असा टोला नीलेश राणे यांनी लगावला.