Sindhudurg: झोळंबेत आढळला किंग कोब्रा, सुरक्षितरीत्या रेस्क्यू करण्याची राज्यातील दुसरी घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 18, 2024 06:54 PM2024-04-18T18:54:26+5:302024-04-18T18:54:58+5:30
वझरे येथे सर्वप्रथम हा साप पकडण्यात आला होता
वैभव साळकर
दोडामार्ग : झोळंबे येथे किंग कोब्रा पकडून त्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. महाराष्ट्रात किंग कोब्रा पकडण्याची सरकारदरबारी झालेली ही दुसरी नोंद असून, यापूर्वीही तालुक्यातीलच वझरे येथे सर्वप्रथम हा साप पकडण्यात आला होता.
किंग कोब्रा (नागराज) हा साप विषारी असून, तो लांबीने साधारण २० फुटांपेक्षा अधिक वाढतो. पश्चिम घाटामधील ''किंग कोब्रा''च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग तालुका आहे. या तालुक्यातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच ''किंग कोब्रा''च्या नोंदी आहेत. बुधवारी सकाळी झोळंबे गावातील सतीश कामत यांच्या मालकीच्या बागायतीत 'किंग कोब्रा'चे दर्शन घडले. येथील एका झाडावर हा ''किंग कोब्रा'' बसला होता. कामत यांनी यासंदर्भातील माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांना दिली. भिसे यांनी वन विभागाला कळवून या सापाचे बचाव कार्य करण्यास सांगितले.
अमृत सिंग यांच्याकडून सापाचे काळजीपूर्वक रेस्क्यू
याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सावंतवाडी वन विभागाच्या फिरत्या पथकाचे अधिकारी मदन क्षीरसागर व त्यांची टीम दुपारी घटनास्थळी दाखल झाली. झाडावर बसलेल्या 'किंग कोब्रा' ११.५ फुटांचा असल्याने त्याला पकडण्यासाठी तज्ज्ञ सर्पमित्रांची गरज होती. म्हणून वन विभागाने गोव्यातील 'रेस्क्यू स्कॉड' पथकातील सर्पमित्रांना पाचारण केले. पथकाचे प्रमुख अमृत सिंग यांनी काळजीपूर्वक सापाचे रेस्क्यू केले. त्यानंतर सापाची तपासणी करुन अधिकाऱ्यांदेखत त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.