शिरगावचा राजा मल्हारच्या रूपात

By admin | Published: August 29, 2014 10:57 PM2014-08-29T22:57:16+5:302014-08-29T23:08:55+5:30

६५ वर्षांपूर्वी स्थापना : देवगड तालुक्यातील एकमेव सार्वजनिक गणपती

King of Shirgaon as Malhar | शिरगावचा राजा मल्हारच्या रूपात

शिरगावचा राजा मल्हारच्या रूपात

Next

दिनेश साटम -- शिरगाव -देवगड तालुक्यातील एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावच्या राजाचा थाट काही औरच आहे. ६६ वर्षाची परंपरा असलेल्या या सार्वजनिक गणपतीची स्थापना ६५ वर्षांपूर्वी गावातील विविध क्षेत्रातील जुन्या-जाणकार मंडळींनी एकत्र येऊन केली. यावर्षी मल्हारी मार्तंडच्या रूपातील मूर्ती आकर्षण ठरत आहे.
शिरगाव येथील पहिल्यावहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना त्यावेळी (कै.) रामभाऊ त्रिभुवणे यांच्या घरी करण्यात आली होती. त्यावेळीचे मूर्तिकार कै. जनार्दन वाडये यांच्या कुंचल्यातून मूर्ती साकारल्याचे जुने जाणकार सांगतात. त्यानंतर सम्राट तरूण मंडळाने ही परंपरा पुढे सुरू ठेवली. १९७९ साली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यापासून आजतागायत शिरगाव बाजारपेठेतील एसटी स्थानकासमोरील अ‍ॅड. आर. व्ही. साटम यांच्या इमारतीत हा गणेशोत्सव उत्साहात पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात येतो. शिरगावच्या राजाची मूर्ती शाडूच्या मातीचीच असते. इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर मंडळाने भर दिला आहे. दरवर्षी दशक्रोशीतील प्रत्येक एका मूर्तिकाराला आपली कला दाखविण्याची संधी दिली जाते. यावर्षी शिरगावच्या राजाची मल्हारी मार्तंडच्या रूपातील सुबक रेखीव मूर्ती अंकुश मेस्त्री यांच्या कुंचल्यातून साकारली आहे. तर आकर्षक विद्युत रोषणाई उमेश अनभवणे यांनी केली आहे.
संपूर्ण उत्सव काळात प्रत्येक कामाची जबाबदारी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, येथील राजे ग्रुप, रिक्षाचालक-मालक संघ, मित्र शिरगाव, संकल्प प्रतिष्ठान, व्यापारी संघ यासारख्या मंडळांना नेमून देण्यात येते.
उत्सव काळात दशक्रोशीतील भजने, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम, श्री सत्यनारायणाची महापूजा, दररोज ब्राह्मणांकरवी पूजा, महाआरती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखून शांततेत हा उत्सव पार पाडण्यासाठी देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव पोलीस दूरक्षेत्राचे विशेष सहकार्य मंडळाला लाभते. उत्सवकाळात पोलिसांसह होमगार्डही बंदोबस्तास सहभागी आहेत. २००६ साली तत्कालिन पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी सामाजिक जाणिवेतून पोलीस दलाला सहकार्य देऊन उत्सव शांततेत पार पाडला. तसेच कायदा व सुव्यवस्था अत्यंत चांगली राखण्यास सहकार्य केल्याबद्दल मंडळाला सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवास गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भक्तगण येतात.

Web Title: King of Shirgaon as Malhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.