किंगमेकरच ठरला ‘किंग’

By admin | Published: June 11, 2014 12:31 AM2014-06-11T00:31:25+5:302014-06-11T00:35:52+5:30

नगरपालिका राष्ट्रवादीकडे : वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदी मात्र मनसेच्या अभी वेंगुर्लेकरांची निवड

King of the Year 'King' | किंगमेकरच ठरला ‘किंग’

किंगमेकरच ठरला ‘किंग’

Next

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेची मंगळवारी घेण्यात येणारी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आली. मात्र, उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन मनसेचे निलंबित नगरसेवक अभी वेंगुर्लेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कणकवली प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी जाहीर केले. या निवडणुकीत मनसे किंगमेकर ठरणार, असे बोलेले जात होते. पण मनसेचे अभी वेंगुर्लेकर हे शेवटच्या क्षणी स्वत:च किंग ठरले.
वेंगुर्ले नगराध्यक्षपदाची निवडणूक मंगळवार १० जून रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ५ जून पासून निवडणूक प्रक्रिया सुरूही झाली होती. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या केसरकर गटाचे प्रसन्ना उर्फ पप्पू कुबल व नगराध्यक्षा पूजा कर्पे यांच्या गटाचे मनीष परब या दोन्ही नगरसेवकांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्ही गटांकडून व्यूहरचनाही आखण्यात आली होती. तत्पूर्वी, सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जून ते आॅक्टोबर दरम्यान मुुदत संपत असलेल्या नगराध्यक्षांना मुदतवाढ देण्यात आल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या.
मात्र, यासंदर्भातील आदेश प्रशासनाला सोमवारी उशिरापर्यंत प्राप्त न झाल्याने निवडणूक अधिकृतरित्या रद्द झाल्याचे सांगण्यात आले नव्हते. मात्र, मंगळवारी सकाळी वेंगुर्ले नगर परिषदेच्या सभागृहात निवडणुकीसंदर्भातील विशेष सभेला सुरुवात होताच निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश आपल्याला प्राप्त झाले असून नगराध्यक्षपदाची निवडणूक रद्द करण्यात आल्याचे सांगितले. तशा प्रकारच्या आदेशाची प्रत सभागृहात वाचून दाखविली. मात्र, यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रसन्ना कुबल, नगरसेवक रमण वायंगणकर व त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी याला आक्षेप घेतला व याची नोंद प्रोसिडींगमध्ये घेण्यात यावी, अशी लेखी मागणी केली. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर या आदेशाला प्रसन्ना कुबल गटाच्या नगरसेवकांनी हरकत घेतल्याची नोंद प्रोसिडींगमध्ये करण्यात आली.
नगराध्यक्षपदाची निवडणूक जरी पुढे ढकलण्यात आली असली, तरी सकाळी १० वाजल्यापासून ठरल्याप्रमाणे उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी मनसेचे निलंबित नगरसेवक अभी वेंगुर्लेकर यांनी आपले दोन अर्ज व नगरसेविका फिलोमिना कार्डोज यांनी दोन अर्ज दाखल केले. अभी वेंगुर्लेकर यांच्या एका अर्जासाठी सूचक म्हणून रमण वायंगणकर व अनुमोदक म्हणून सुलोचना तांडेल व दुसऱ्या अर्जासाठी सूचक म्हणून अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर व अनुमोदक म्हणून निली भागवत यांनी सह्या केल्या. तर फिलोमिना कार्डाेज यांच्या एका अर्जासाठी सूचक म्हणून वामन कांबळे व अनुमोदक म्हणून पूजा कर्पे, तर दुसऱ्या अर्जासाठी सूचक मनीष परब व अनुमोदक शैलेश परब यांनी सह्या केल्या. यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत अचानकपणे फिलोमिना कार्डोज यांनी आपला अर्ज मागे घेतला व निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी अभी वेंगुर्लेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी सर्व नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅन्थोनी डिसोजा, माजी तालुकाध्यक्ष दीपक नाईक, माजी शहराध्यक्ष सचिन वालावलकर, राष्ट्रवादीचे कुडाळ सरचिटणीस भास्कर परब, जिल्हाध्यक्ष अमरसेन सावंत, राष्ट्रवादी शेतकरी संघटनेचे शिवाजी घोगळे, शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत नाईक, कुडाळ तालुका कार्यकारिणी सदस्य उत्तम सराफदार, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य शिवाजी कुबल, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी स्रेहा कुबल, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, अभी वेंगुर्लेकर मित्रमंडळाचे पंकज शिरसाट, अनुप कांबळी, प्रितम जाधव, शेखर काणेकर, चेतन कुबल आदी कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून अभी वेंगुर्लेकर यांचे अभिनंदन
केले. (प्रतिनिधी)

Web Title: King of the Year 'King'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.