किंगकोब्रा साप पकडून केला व्हिडिओ; संशयिताला अटक
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 7, 2022 01:41 PM2022-09-07T13:41:24+5:302022-09-07T13:42:19+5:30
दुर्मिळ प्रजातीच्या सापाला अवैद्यरित्या ताब्यात ठेवण्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावामध्ये सोमवारी सायंकाळी पकडलेला दुर्मिळ किंगकोब्रा प्रजातीचा साप अवैधरित्या बाळगून त्याचे चित्रीकरण करणे, प्रदर्शन करणे या प्रकरणी संशयित राहुल विजय निलगिरी या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दोडामार्ग येथे राहणारा असून मंगळवारी सायंकाळी वनविभाग अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. अशी माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली.
या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी राहुल विजय निरलगी हा सर्प इंडिया या एनजीओच्या अंतर्गत काम करत असून गेली दोन-तीन दिवस तो पाळये येथे दिसून येणाऱ्या किंगकोब्रा सापाच्या पाळतीवर होता. किंगकोब्रा सापाला पकडण्यापूर्वी वनविभागाला पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे हे त्या युवकाला माहीत होते. तरीदेखील त्याने दोडामार्ग येथील स्थानिक वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता किंकोब्रा अवैद्यरित्या पकडून आपल्या ताब्यात ठेवला.
दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यलयाला सोमवारी सायंकाळी याप्रकरणी गुप्त माहिती मिळताच संबंधित युवकाचा व त्याच्या ताब्यात असलेल्या किंगकोब्रा सापाचा वनविभागाने शोध सुरू केला. आरोपी राहुल नीरलगी याचेशी वन अधिकारी व कर्मचारी यांनी फोनवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु रिंग होऊन देखील त्याने कुणाचाही फोन उचलला नाही किंवा दुर्मिळ किंगकोब्रा वन विभागाच्या ताब्यात दिलेला नाही. सकाळी संशयिताला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यलयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी चौकशीदरम्यान त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच गुन्ह्यात फोटो-व्हिडीओ काढण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन त्याने लंपास केला असल्याचे निदर्शनास आले.
सर्पमित्रांनी दुर्मिळ सापांना पकडू नये : मदत क्षीरसागर
किंगकोब्रा सापाला अवैद्यरित्या बाळगून त्याचे पुरावे नष्ट केल्यामुळे सायंकाळी त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ च्या तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये ज्याप्रमाणे वाघ, बिबट, गवा या प्राण्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे दुर्मिळ अशा किंगकोब्रा सापाला देखील संरक्षित करण्यात आलेले आहे. त्यानुसार या दुर्मिळ प्रजातीच्या सापाला अवैद्यरित्या ताब्यात ठेवण्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तरी वनविभागामार्फत सर्व सर्पमित्रांना आवाहन करण्यात येते की वन विभागाला कळविल्याशिवाय असे दुर्मिळ साप अवैधरित्या आपल्या ताब्यात बाळगू नये असे आवाहन वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी केले आहे.