पावसाच्या आगमनाने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 06:02 PM2020-06-04T18:02:30+5:302020-06-04T18:03:03+5:30
गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने नांदगांव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. मात्र, या पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तळेरे : गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने नांदगांव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. मात्र, या पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रविवारी सायंकाळपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्या. अचानक आलेल्या पावसाने वातावरणात थंडावा निर्माण झाला. तरीदेखील पावसापूर्वी करायची कामे शिल्लक असल्याने अनेकांची धावपळ झाली.
नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर महामार्गाच्या मातीमुळे सर्वत्र चिखल पसरला आहे. सध्या एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे आता पावसाला सुरुवात झाल्याने या आरोग्य केंद्रात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. या लोकांना अशा चिखलातून जावे लागणार आहे. याशिवाय दुचाकी अशा चिखलातून घसरून पडण्याची शक्यता आहे. यातून मोठा अपघात घडू शकतो.
नांदगाव तिठ्यावरील काही दुकानांसमोर पहिल्याच पावसाने अक्षरश: चिखल साचला आहे. नियमित रस्त्यालगत असणारे गटार उपसून माती रस्त्यावर टाकण्यात आली. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. याबाबत यापूर्वीच या व्यावसायिकांनी संबंधित प्रशासनाला याची पूर्वकल्पना देऊनही आता त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला जबाबदार कोण? असा सवाल करीत स्थानिक व्यवस्थापनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
यातच वीज आणि दूरध्वनी सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकवून अगोदरच हजेरी लावलेल्या या पावसामुळे अनेक कामे अर्धवटच राहण्याची शक्यता आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही कामे बंद होती. ती आता सुरू झाली. तोपर्यंत पावसाचे आगमन झाले आणि पुन्हा सुरू केलेली कामे थांबवावी लागणार असल्याचे दिसून येते.