उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यावर चाकू हल्ला, दोघांना अटक, एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 03:20 PM2020-03-24T15:20:07+5:302020-03-24T15:22:31+5:30
गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार पकडून कारवाई केल्याचा राग मनात धरून इन्सुली उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना इन्सुली तपासणी नाक्यावर रविवारी रात्री घडली.
बांदा : गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार पकडून कारवाई केल्याचा राग मनात धरून इन्सुली उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना इन्सुली तपासणी नाक्यावर रविवारी रात्री घडली.
संशयित नितीन प्रकाश सुर्यवंशी (४२, रा माजगाव तांबळगोठण) याने केलेल्या चाकू हल्ल्यात दुय्यम निरीक्षक शैलेंद्र हरिश्चंद्र चव्हाण (५१, रा. कल्याण, सध्या रा. सावंतवाडी ) यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी नितीन सूर्यवंशीसह रामजी विनायक देसाई (३०, रा. माजगांव ) व नजरेआड असलेला बाळा राठवड (रा. माजगाव कासारवाडा) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी एकजण परार असल्याची माहिती बांदा पोलिस निरिक्षक अनिल जाधव यांनी दिली.
संशयितांवर गुन्हा दाखल
हे मारहाणीचे थरारनाट्य रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाक्यावर घडले. याबाबतची तक्रार शैलेंद्र चव्हाण यांनी बांदा पोलिसांत दाखल केली आहे. यात उत्पादन शुल्कचे चालक रमेश चंदुरे यांना ठार मारण्याची धमकी संशयितांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलिस करीत आहे.