अपक्षांमुळे ‘काँटे की टक्कर’
By admin | Published: November 16, 2016 10:31 PM2016-11-16T22:31:43+5:302016-11-16T22:31:43+5:30
सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग पाचमध्ये दोन जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात
सावंतवाडी : येथील प्रभाग पाचवर संपूर्ण सावंतवाडीचेच लक्ष लागून राहिले असून, या प्रभागातून दोन जागांसाठी १३ उमेदवार रिंंगणात उतरले आहेत. यातील अपक्षांची संख्या मोठी असल्याने सध्या या प्रभागात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनविला असल्याने प्रत्येक पक्षाची डोकेदुखीही वाढली आहे.
सावंतवाडीतील प्रभाग पाचमध्ये उभा बाजार, जुना बाजारपासून सालईवाड्याचा काही भाग कंटक पाणंद असा शहरी भाग येतो. भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग लहान असला, तरी उच्चशिक्षित मतदारच या प्रभागात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी उच्चशिक्षित आणि ज्यांचा मतदारांवर प्रभाव पडेल, असेच उमेदवार येथे उभे केले आहेत.
या प्रभागातून भाजपने पूजा पोकळे व उमेश कोरगावकर यांना, तर शिवसेनेने कीर्ती बोंद्रे व शिवप्रसाद ऊर्फ मुन्ना कोरगावकर यांना संधी दिली आहे. काँग्रेसने पल्लवी रेगे व सुधीर आडिवरेकर यांना निवडणूक मैदानात उतरविले आहे. अपक्ष म्हणून सीमा मठकर, साक्षी वंजारी, अन्नपूर्णा कोरगावकर, वैष्णवी ठोंबरे या स्त्री उमेदवारांबरोबरच पुरुष उमेदवारांतून गुरुदत्त गवंडळकर, अरुण भिसे, परीक्षित मांजरेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे.
प्रभाग पाचमध्ये पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व राहिले. त्यामुळे शिवसेनेतून अनेकजण इच्छुक होते. मात्र, अंतिम क्षणी मुन्ना कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर त्यांच्यासोबत विद्यमान नगरसेविका कीर्ती बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने या प्रभागातून माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांना संधी दिली आहे. तसेच या प्रभागातून पूजा पोकळे या नवख्या उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
भाजपने पोकळे यांचे घराणे या प्रभागात मोठे असल्याने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप पक्ष या प्रभागात चर्चेत आला आहे. काँग्रेसने शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर व पल्लवी रेगे यांना संधी दिली आहे. आडिवरेकर यांचा प्रभाव हा जुना बाजारभागामध्ये मोठा आहे. दोघेही नवखे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत, तर शिवसेनेनेही मुन्ना कोरगावकर यांना नव्याने संधी दिली आहे. उमेश कोरगावकर यांचाही उभाबाजारमध्ये चांगला लोकसंपर्क आहे.
मात्र, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अरुण भिसे यांनी याच प्रभागातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांना अचानक भाजपने डावलल्याने त्यांनीही बंडखोरी करीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांना मतदारांची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. या प्रभागातून गुरुदत्त गवंडळकर व सीमा मठकर यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने सर्वच पक्षांना हे अपक्ष उमेदवार डोकेदुखी ठरणार आहेत.
मात्र, पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांबराबरच अपक्ष उमेदवारांनी प्रत्येक घरोघरी प्रचार सुरू केला असून, आपणास मिळणाऱ्या मतांचे आडाखे बांधत आपलाच विजय असल्याचे सर्वजण सांगत आहेत. मात्र, पुढील काही दिवसांत या प्रभागात कोण जास्त प्रचारावर भर देतो व छुपे आडाखे बांधतो, त्यावरच उमेदवारांचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. (प्रतिनिधी)
अपक्षांचा परिसरात चांगला जनसंपर्क
या प्रभागात अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. अनेक उमेदवार हे पक्षाचे काम करूनही डावलल्याची तक्रार करीत उभे राहिले आहेत. अपक्षांचा त्यांच्या परिसरात चांगला जनसंपर्क असल्याने प्रत्येक उमेदवाराला ती डोकेदुखी ठरणारी आहे. या प्रभागावर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यातच या प्रभागात अपक्षांसारखीच नाराजांची संख्या जास्त असल्याने नाराज कोणाला मदत करणार, यावर बरेच काही अवलंबून आहे.