भाजपची खेळी ओळखा, राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या आमदारांना जितेंद्र आव्हाडांचा सल्ला
By अनंत खं.जाधव | Published: July 11, 2023 02:12 PM2023-07-11T14:12:38+5:302023-07-11T14:13:25+5:30
केसरकरांना कात्रजचा रस्ता तरी माहित आहे का?
सावंतवाडी : मंत्रीमंडळ विस्तार होऊन आठवडा उलटला तरी मंत्रीपदे दिली जात नाही. यावरूनच राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्यांनी भाजपची खेळी ओळखावी असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आव्हाड यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या जुन्या टीकेचा संदर्भ घेत पवारांना कात्रजचा घाट दाखवणे म्हणजे फू फू करणे नव्हे असा टोला लगावला.
आमदार आव्हाड हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता सावंतवाडीतील जयप्रकाश चौकात त्याचे राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले, महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, अफरोज राजगुरू, जावेद शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवरून भाजप नेच शरद पवार यांचे घर फोडले हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोण सांगत असेल की आपण त्यातले नाही त्याचा खरा चेहरा खोत यांनीच उघड केल्याचे आव्हाड म्हणाले. जे राष्ट्रवादीतून फुटून गेलेत त्यांना अद्याप मंत्रीपदे देण्यात आली नाहीत. विस्तार होऊन आठवडा उलटून गेला त्यामुळे गेलेल्यांनी आतातरी भाजपचा डाव ओळखावा असा सल्लाही आव्हाड यांनी दिला.
कात्रजचा रस्ता तरी केसरकरांना माहित आहे का?
शरद पवार यांना कात्रजचा घाट दाखवणाऱ्या मंत्री दीपक केसरकर यांना कात्रजचा रस्ता तरी माहित आहे का? असा सवाल करत बंडखोरांना राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद दाखवेल असेही आव्हाड म्हणाले.