अधिकाऱ्यांना ज्ञानाचे धडे
By admin | Published: December 1, 2015 10:42 PM2015-12-01T22:42:16+5:302015-12-02T00:43:04+5:30
राजापूर पंचायत समिती सभा : शिक्षण विभागावर सदस्यांचे जोरदार ताशेरे
राजापूर : सातत्याने टिकेचे धनी ठरणारा राजापूर पंचायत समितीचा शिक्षण विभाग सोमवारी पार पडलेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत पुन्हा एकदा सदस्यांच्या रडारवर राहिला. या विभागातील अनागोंदी कारभारावर संतप्त सदस्यांनी सडेतोड टीका करताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्यावरही निशाणा साधला.
राजापूर पंचायत समितीची मासिक सभा सभापती सोनम बावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला गटविकास अधिकारी, त्यांचा विविध विभागाचा अधिकारीवर्ग व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, नेहमीप्रमाणे शिक्षण विभाग टीकेच्या रडारवर राहिला. राजापूर शिक्षण विभागाच्या एकूणच कारभारावर उपस्थित सदस्यांनी शंकाकुशंका उपस्थित करीत तोंडसुख घेतले.
चालू शिक्षण क्षेत्राची सहामाही मुदत संपली तरी गणित व विज्ञान विभागाच्या परीक्षाच झाल्या नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली. शाळांच्या दुरुस्त्यांचाही मुद्दा चर्चेत आला. पण, त्याबाबत कोणत्या शाळांचे दुरुस्ती प्रस्ताव तयार झालेत व कोणत्या शाळांचे राहिले, त्यावर विस्तृत माहिती प्राप्त न झाल्याने पंचायत समिती विभागांतर्गत असलेल्या समन्वयाचा अभाव दिसून आला. त्यामुळे संतापलेल्या सदस्यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करणारे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक सोळंकी यांना धारेवर धरले. अनागोंदी कारभाराबद्दल गटविकास अधिकारीदेखील सुटले नाहीत. पंचायत समिती सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. त्यावेळी पंचायत समितीचा शिक्षण विभागाचे अधिकारी सूचनांचे पालन करत नसल्याचे सांगून गटविकास अधिकाऱ्यांनी आपली असमर्थता दाखवून दिली.
तालुक्यात वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीपैकी काही अखर्चिक राहिला असून तो पुन्हा शासनाकडे वर्ग होणार आहे. हा निधी अन्य कामांसाठी वापरता आला तर त्याचा वापर करा, अशा सुचनाही मांडण्यात आल्या. राजापूर एसटी आगाराने नुकत्याच संपलेल्या पंढरपूर यात्रेसाठी ३९ गाड्या सोडून प्रवाशांची चोख व्यवस्था केल्याबद्दल एसटी आगाराचे अभिनंदन करण्यात आले.
तालुक्यात ११ अंगणवाडी सेवीका तर १९ ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविकांची कमतरता असल्याचे सांगितले. तालुक्यातील कशेळीमधील उपकेंद्र ताब्यात घेण्यात यावे अशी माहिती आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतीला दिल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट होताच ती इमारत अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र तिचा ताबा कसा काय देणार, असा सवाल पंचायत समिती सदस्य दिपक नागले यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
गटविकास अधिकारी : काजिर्डा गावात फिरती शौचालये
तालुक्यातील १०१पैकी ६८ ग्रामपंचायती नोव्हेंबरपर्यंत हागणदारीमुक्त झाल्या असून, डिसेंबरअखेर त्या शंभर टक्के होतील, अशी माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी सभागृहाला दिली. मात्र, धरणामुळे काजिर्डा गावचे पुनर्वसन होणार असल्याने त्या गावात फिरती शौचालये दिली जाणार आहेत. तालुक्यातील ३७५ वनराई तर ५० कच्चे बंधारे बांधण्यात आल्याने पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.
नवीन घरांची परवानगी
ग्रामीण भागातील प्रत्येक गावात यापुढे नवीन घर बांधण्यासाठी आता तेथील ग्रामपंचायतीऐवजी तालुकास्तरावरून परवानगी घ्यावी लागणार आहे. यापुढे ग्रामपंचायतीची परवानगी ग्राह्य धरली जाणार नाही, अशी माहिती या सभेत देण्यात आली.