कोलगाव दरवाजा इतिहासजमा होतोय

By admin | Published: April 2, 2015 01:03 AM2015-04-02T01:03:40+5:302015-04-02T01:27:40+5:30

वास्तूची पडझड : प्रशासनाचे दुर्लक्ष, इमारतीच्या कामासाठी पंधरा लाखांची तरतूद

The Kolgaon Door histories are happening | कोलगाव दरवाजा इतिहासजमा होतोय

कोलगाव दरवाजा इतिहासजमा होतोय

Next

प्रसन्न राणे - सावंतवाडी --सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील ऐतिहासिक वारशाची आठवण करुन देणारा, इतिहासाची साक्ष देणारा कोलगाव दरवाजा हा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. कोलगाव दरवाजाचे छप्पर मोडकळीस आले असून सौंदर्यही लोप पावत आहे. कोकण विकास पॅकेज अंतर्गत १५ लाख रुपयांची तदतूद २००४ साली करण्यात आली होती. मात्र, या इमारतीचे काम ठप्प झाले आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पर्यटनदृष्ट्या आकर्षक ठरणारा हा ऐतिहासिक वारसा जपणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे पर्यटनदृष्ट्या सावंतवाडीच्या विकासाला चालनाही मिळू शकते.
कोलगाव दरवाजा या ऐतिहासिक वास्तूचे काम २००४ साली १५ लाख रुपये खर्ची घालून करण्यात आले होते. यावेळी चित्रांच्या माध्यमातून सावंतवाडी संस्थानाचा इतिहास पर्यटकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तत्कालीन नगरविकास मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्षित करण्यात आल्याचे दिसत आहे.
या वास्तूमध्ये त्यावेळी येणाऱ्या पर्यटकांना छायाचित्रे पाहण्याकरिता अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आतमध्ये एअर कंडिशन लावण्यात आले होते. कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक आकर्षक छायाचित्रे दादा मालवणकर व आनंद ठोंबरे यांनी या वास्तूमध्ये लावली आहेत.
अनेक सोयीसुविधा इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परंतु आता या वास्तूकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
कोलगाव दरवाजा वास्तूतील छप्पर मोडकळीस आले असून अनेक पावसाळे या इमारतीने झेलले आहेत. पावसामुळे इमारतीत पाणी घुसून आतील सर्व छायाचित्रे भिजून सर्व वाया गेली आहेत. तर आत करण्यात आलेल्या सर्व सोयीसुविधांचा चक्काचूर झाला आहे. यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर या पुरातन वास्तूची पडझड थांबविणे कठीण आहे.


...तर पर्यटनदृष्ट्या चालना मिळेल
मुंबई - गोवा महामार्गानजीक कोलगाव दरवाजाची ही ऐतिहासिक वास्तू उभी आहे. अनेक पर्यटकांनी या वास्तूला भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र, इमारतीला धोका उत्पन्न झाल्यापासून इमारतीमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक निराश होऊन माघारी परतले आहेत. कोकण विकास पॅकेज अंतर्गत या इमारतीवर खर्चही करण्यात आला आहे. मात्र, आता या वास्तूकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने या वास्तूकडे लक्ष देत वास्तूची दुरुस्ती करून पुन्हा एकदा चालू करावी. जेणेकरून पर्यटनदृष्ट्या त्या भागात विकासाला चालना मिळेल. सावंतवाडी शहराचाही पर्यटनदृष्ट्या कायापालट होईल.


शासनाला ऐतिहासिक वास्तूंची किंमत नाही
सावंतवाडी शहराच्या इतिहासाची पर्यटकांना ओळख व्हावी यासाठी सावंतवाडी शहरवासीयांच्या प्रेमापोटी अत्यंत कमी मोबदल्यात कोलगाव दरवाजा वास्तूसाठी अनेक संस्थानकालीन चित्रे तयार करून दिली होती. मात्र, कमी किमतीने दिलेल्या चित्रांची किंमत प्रशासनाला नसल्याने याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसत आहे. लोकप्रतिनिधींचा सर्व पैसा वाया घालविण्याचे काम प्रशासनाने केले आहे. ही इमारत दुरुस्त झाल्यास पर्यटकांना आकर्षक अशी संस्थानकालीन छायाचित्रे कोलगाव दरवाजाच्या वास्तूत लावल्यानंतर पाहता आली असती. मात्र, त्या छायाचित्रांची आणि कोलगाव दरवाजाच्या वास्तूची देखभाल प्रशासनाला करता आली नाही, हे दुर्दैव आहे.
- आनंद ठोंबरे,
ज्येष्ठ चित्रकार, सावंतवाडी


राजघराण्याचा इतिहास चित्रप्रदर्शनाद्वारे या वास्तूमधून दाखविला जात होता. आता या इमारतीची दुरवस्था झाली असल्याने इतिहासाची ओळख हरवत चालली आहे. कोलगाव दरवाजाची दुरुस्ती होऊन पुन्हा चित्रप्रदर्शने घेणे अत्यंत आवश्यक आहे. या वास्तूच्या इमारतीतूनच संपूर्ण सावंतवाडीचा इतिहास दर्शविला जात आहे.
- दादा मालवणकर,
ज्येष्ठ चित्रकार सावंतवाडी


हा सावंतवाडीतील ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे. कोलगाव दरवाजाच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच आतील सामानाचीही दुरुस्ती करून लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करण्यात येईल. जेणेकरून सावंतवाडीचा इतिहास कायमस्वरूपी तेवत राहिल.
- बबन साळगावकर,
नगराध्यक्ष, सावंतवाडी

Web Title: The Kolgaon Door histories are happening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.