कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:53 PM2018-07-16T23:53:50+5:302018-07-16T23:53:54+5:30
वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, करूळ घाटात दिंडवणेवाडीनजीक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. जेसीबीद्वारे दरड हटवून मार्ग खुला करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरल्यामुळे विसर्ग वाढला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी १०.३०च्या सुमारास मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला पाणी कमी असल्याने पाण्यातून वाहतूक सुरू होती. रस्त्यावरील पाण्याची पातळी वाढल्यामुळे शेवटी सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी सकाळी ११ वाजता गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून गगनबावड्यात गेलेली वाहने करुळ-वैभववाडी-फोंडाघाटमार्गे फिरविली.
गगनबावडा पोलिसांनी कोल्हापूर मार्ग बंद केल्याची माहिती सर्व पोलीस ठाण्यांसह राज्य परिवहन महामंडळाला तातडीने कळविली. त्यामुळे वाहतूक नियंत्रकांनी वैभववाडीतून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस तर पोलिसांनी अन्य वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली. कोल्हापूरकडे जाणाºया वाहनांना करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी अटकाव करूनही जबरदस्तीने काही वाहनचालक गगनबावड्यात जाऊन पुन्हा माघारी परतल्याचे दिसून आले.
दरम्यान, सकाळी करूळ घाटात दिंडवणेवाडीजवळ दरड रस्त्यावर आली होती. कोसळलेल्या दरडीच्या ढिगाºयात दगडमातीसह झुडपांचा समावेश असल्याने जवळपास निम्म्याहून अधिक रस्ता बंद झाला होता. परंतु, एकेरी वाहतूक सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरडीचा ढिगारा हटवून दुपारी १२.३० च्या सुमारास घाटमार्ग पूर्णपणे खुला केला.
...तर काही दिवस मार्ग राहणार बंद
गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील पुराच्या पाण्याच्या पातळीत दुपारनंतर वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाचा जोर कायम राहिल्यास गगनबावडा-कोल्हापूर महामार्ग पुढील काही दिवस बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी आणि माल वाहतुकीला फटका बसणार आहे.