कोल्हापूरची एकांकिका प्रथम!, कणकवलीत बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटाचा निकाल जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 05:04 PM2022-12-31T17:04:52+5:302022-12-31T17:05:11+5:30
कलरफूल माँक, मुंबईची ‘टिनीटस’ द्वितीय तर' ढ 'मंडळी, कुडाळची ‘वाल्मिकी’ही एकांकिका तृतीय क्रमांक
कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित बॅ.नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटात परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूरच्या ‘जंगल जंगल बटा चला है’ला प्रथम क्रमांक मिळाला आहे. कलरफूल माँक, मुंबईची ‘टिनीटस’ द्वितीय तर' ढ 'मंडळी, कुडाळची ‘वाल्मिकी’ही एकांकिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शनमध्ये ‘टिनीटस’चे नचिकेत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ‘जंगल जंगल बटा चला है’चे किरणसिंह चव्हाण यांनी द्वितीय तर रंगयात्रा नाट्य संस्था, इचलकंरजीच्या ‘हा वास कुठून येतोय?’चे अनिरुद्ध दांडेकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तांत्रिक अंगांमध्ये ‘टिनीटस’ने प्रथम क्रमांक पटकाविला. ‘जंगल जंगल बटा चला है’ने द्वितीय तर झिरो बजेट प्रोडक्शन,सिंधुदुर्गच्या ‘दिल ए नादान’ ने तृतीय क्रमांक पटकाविला.
अभिनय पुरुषमध्ये ‘टिनीटस’मध्ये डॅनीची भूमिका साकारलेला आदित्य खेडेकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. ‘हा वास कुठून येतोय?’मध्ये जगन्याची भूमिका साकारलेला प्रतीक हुंदरे याने द्वितीय तर वक्रतुंड थिएटर, नेरूरच्या ‘मधूमाया’मध्ये मधूची भूमिका साकारलेला योगेश जळवी याने तृतीय क्रमांक पटकाविला.
अभिनय स्त्रीमध्ये कलासक्त, मुंबईच्या ‘विभावांतर’मध्ये अन्वयाची भूमिका साकारलेली डॉ. यशश्री कंटक हिने प्रथम क्रमांक पटकाविला. समांतर सांगलीच्या ‘मर्सिया’मध्ये अहिल्याची भूमिका साकारलेली धनश्री गाडगीळ हिने द्वितीय तर नाट्यसमर्थ गोरेगावच्या ‘पानंद’मध्ये अनुष्काची भूमिका साकारलेली ज्ञानदा खोत हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
उत्तेजनार्थ पारितोषिक राडा क्रिएशन, मुंबईच्या ‘झो झेंगाट झाल ना’मध्ये नानाची भूमिका साकारलेल्या दीपक लांजेकर व स्मृती थिएटर्सच्या ‘जांभूळ पडल्या झाडाखाली’मध्ये माळीणची भूमिका साकारलेल्या किमया कदम हिने पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रवीण भोळे व अरुण घाडीगांवकर यांनी केले. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे शरद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वी संघाचे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड.नारायण देसाई यांनी अभिनंदन केले.