सहलीला गेला, पोहण्यासाठी तारकर्लीच्या समुद्रात उतरला अन् बुडाला; शोधकार्य सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:44 AM2023-11-11T11:44:24+5:302023-11-11T11:45:51+5:30
अहो फोन भिजला आहे..
मालवण : सहलीसाठी आलेल्या मुरगूड येथील संगणक प्रशिक्षण संस्थेच्या ग्रुपमधील एक विद्यार्थी तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. आदित्य पांडुरंग पाटील (२१ रा. बस्तवडे, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तर अजिंक्य बळीराम पाटील (२०, रा. कौलगे, ता. कागल) यासह प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे या दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. अजिंक्यवर मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे सर्व विद्यार्थी मुरगूड (जि. कोल्हापूर) येथील एका संगणक प्रशिक्षण संस्थेमार्फत सहलीसाठी आले होते. समुद्रात मुले बुडत असल्याचे समजताच स्थानिकांनी जिवाची पर्वा न करता तत्काळ समुद्रात झेप घेतली. मात्र खोलवर शोधकार्य करूनही आदित्य सापडू शकला नाही. या शोधकार्यात तारकर्ली स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्राचे स्कुबा डायव्हर्सही सहभागी झाले होते.
मुरगूड येथील २० विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तारकर्ली येथे सहलीसाठी आला होता. हे सर्व मुरगूड येथील एका संगणक प्रशिक्षण क्लासेसचे विद्यार्थी होते. यामध्ये ८ मुले व १२ मुली आणि एका शिक्षिकेचा समावेश होता. शुक्रवारी कुणकेश्वर येथे देवदर्शन करून सायंकाळी तारकर्ली येथील समुद्रात हे विद्यार्थी पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी आदित्य हा समुद्रात बुडून बेपत्ता झाला. तर अजिंक्य पाटील, प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे सर्व हे खोल समुद्रात ओढले जाऊ लागले. यातून आदित्य हा समुद्रात बेपत्ता झाला आहे. यावेळी तत्काळ रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. बचावलेल्या अजिंक्यला त्वरित रुग्णवाहिकेतून सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
सायंकाळ झाल्याने बचाव कार्यात अडथळे
मुले समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच सोबत असलेल्या विद्यार्थी आणि प्रशिक्षकांनी मोठ्या आवाजाने स्थानिकांना बोलावून घेतले. स्थानिक मच्छीमार आणि तारकर्ली स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्राच्या सदस्यांनी समुद्रात धाव घेतली. मोठ्या प्रयत्नाने अजिंक्य पाटील व अन्य दोघांना समुद्राबाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. मात्र आदित्य पाटील हा समुद्रात दिसेनासा झाला. त्याचा शोध घेण्याचा स्थानिकांनी बराच वेळ प्रयत्न केला. सूर्य मावळतीला गेल्यामुळे बचाव कार्यात अडथळे आले.
..अन् आदित्य हातातून निसटला
जखमी अजिंक्य पाटील याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही समुद्रात उतरल्यानंतर आदित्य आणि मी पाण्यात बुडू लागलो. अशा परिस्थितीत मी त्याला ओढत पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक मोठी लाट आली आणि आदित्य माझ्या हातून निसटला. आणि पाण्यात दिसेनासा झाला. नाहीतर तो सुद्धा सुखरूप आमच्यासोबत असता असे अजिंक्य याने सांगितले.
अहो फोन भिजला आहे.....
आदित्य ची आई आणि बाबा सांयकाळी सात वाजल्या पासून त्याला फोन करत आहेत पण त्याचा फोन बंद लागतो आहे रात्री दहा पर्यंत परत येणार म्हणून सांगितल्याने ते त्याचा मित्र रितेश यांच्या घरी जाऊन पोरांचा काय फोन आला का अशी केविलवाणी चौकशी करत आहेत. त्यांना आदित्य बेपत्ता आहे याची फुसटशीही कल्पना नाही. त्यामुळे रितेशच्या घरातील लोकांनी धाडसाने त्यांच्या घरी जाऊन आदित्य फोन समुद्रात अंघोळ करताना भिजला आहे त्यामुळे तो बंद झाला आहे पण ते व्यवस्थित आहेत सकाळ पर्यंत परत येणार असल्याचे सांगितले.