कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:16 PM2022-11-14T12:16:24+5:302022-11-14T12:17:13+5:30

गेली काही वर्षे या हळवल फाट्यावरील वळणावर महामार्गाचे चौपदरीकरण होऊन देखील सातत्याने अपघात होत आहे

Kolhapur youth killed in accident in Kankavli | कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना

कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना

googlenewsNext

कणकवली : मालवाहतूक  करणाऱ्या आयशर टेम्पोला मुंबई- गोवा महामार्गावरील कणकवली गडनदी पुलाजवळ हळवल फाट्यानजिक अपघात झाला. या अपघातात टेम्पोतील क्लिनर जागीच ठार झाला आहे. तर चालकाने टेम्पोतून खाली उडी मारल्याने तो बचावला आहे. रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

आकाश आप्पासो महाजन (२९, रा. मल्हारपेठ, ता. पन्हाळा, कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (क्रमांक एम. एच. ०९ सी. ए.१२८२) घेऊन कोल्हापूर येथून सावंतवाडी बांद्याच्या दिशेने किराणा सामान, पशुखाद्य घेऊन जात होता. हळवल फाटा येथे अचानक  टेम्पोवरील त्याचा ताबा सुटल्याने तो डाव्या बाजूला कलंडला. या अपघातात टेम्पोचा क्लीनर शुभम महादेव झोंजाळ (२६,रा. मल्हारपेठ ,ता.पन्हाळा, कोल्हापूर) हा जागीच ठार झाला.

या अपघाची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पोलीस पाटील सुनील कदम ही दाखल झाले. तसेच पोलिसांना अपघाताची  माहिती देण्यात आली. त्यामुळे  महामार्ग वाहतूक  शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव यांच्यासह त्यांचे पथक तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,उपनिरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस शिपाई किरण कदम,उद्धव साबळे आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो हलवून अडकलेल्या शुभम झोंजाळ याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
अपघात घडल्यानंतर घाबरलेला टेम्पो चालक आकाश महाजन हा घटनास्थळावरून पळून गेला होता. तो थोड्यावेळाने परत तिथे आला.त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.तसेच त्याच्या कडून अपघाताची माहिती घेतली. या अपघातात टेम्पोचे मोठे  नुकसान झाले आहे. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

सातत्याने होतात अपघातात

दरम्यान, गेली काही वर्षे या हळवल फाट्यावरील वळणावर महामार्गाचे चौपदरीकरण होऊन देखील सातत्याने अपघात होऊन संबंधित यंत्रणा पूर्णपणे या स्थितीकडे डोळेझाक करत आहे. तेथे सातत्याने होत असलेल्या अपघातात अनेक जण जखमी झाले तर काहींना जीव गमवावा लागला आहे. हे अवघड वळण अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. सातत्याने अपघात होऊन तसेच या ठिकाणी असलेले स्टॉल हटवण्यासंदर्भात मागणी करून देखील कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने प्रशासन अजून किती बळी जाण्याचा वाट पाहते आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Kolhapur youth killed in accident in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.