कोकण बोर्डाने गुणवत्ता सिद्ध केली
By admin | Published: June 12, 2015 11:22 PM2015-06-12T23:22:42+5:302015-06-13T00:14:15+5:30
दीपक केसरकर : दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सिंधुदुर्गनगरीत गौरव
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे, तसाच तो शिक्षणातही आघाडीवर आहे. यंदा दहावी व बारावीच्या निकालात सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी भर देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दहावी व बारावीमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थी तसेच शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, ग्रामविकास विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर, गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, शिक्षण विभागाने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करावी, असे आदेशही केसरकर यांनी शिक्षण विभागाला यावेळी दिले.
यावेळी जिल्ह्यातील दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार, द्वितीय क्रमांक प्राप्त ३ हजार व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना २ हजार रूपये पारितोषिक वितरण करण्यात आले. दहावीमध्ये अद्वैत देसाई याने ९८.४० टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ५ हजार रूपये, अन्विता कुलकर्णी, भार्गव नारकर, नेहा पावसकर या विद्यार्थ्यांनी ९८.२० टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रत्येकी ३ हजार रूपये, तसेच रोहित कुलकर्णी, कन्हय्या राऊत, जुई निगुडकर यांनी ९८ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रत्येकी २ हजार रूपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
बारावीमध्ये सागर सामंत याने ९५.८४ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ५ हजार रूपये, मंदार चव्हाण याने ९५.०७ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ३ हजार रूपये, कृपा प्रभूने ९२.६१ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल २ हजार रूपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तसेच शासकीय बालगृह ओरोसमधील राजाराम पेडणेकर, नारायण गावडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी १११ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल, २३ ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांचा केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार वैभव नाईक, जिल्हााधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजीराव देसाई यांनी आभार मानले. या साऱ्या कार्यक्रमाला सिंधुर्गातील पालक, यशश्वी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कुशल मनुष्यबळ तयार करणार
केसरकर म्हणाले, स्पर्धा परीक्षा केंद्र जिल्ह्यात लवकरच होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच राहून स्पर्धा परीक्षांना बसून आपली गुणवत्ता सिद्ध करणे शक्य होईल. आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने काही विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नाहीत. स्थानिक ठिकाणी नोकरी करण्यासाठी प्राधान्य देतात, अशा विद्यार्थ्यांकरिता खास प्रशिक्षण आयोजित करून कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच पर्यटनावर आधारित रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत केसरकर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मंत्र्यांनी केले कौतुक.
जिल्हा नियोजन समितीमध्ये करण्यात आला गौरव.
कोकण बोर्डाने गुणवत्ता सिध्द केल्याचे विशेष कौतुक.
केसरकर यांनी केलेय विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक.
विविध मान्यवरांच्या सत्कार.