HSC, SSC Exam Result: शंभर नंबरी यशाचा सिंधुदुर्ग पॅटर्न, उज्ज्वल परंपरा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 01:46 PM2022-06-18T13:46:01+5:302022-06-18T13:55:31+5:30

कोकण बोर्डची निर्मिती झाल्यानंतर गेली १२ वर्षे म्हणजे एक सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांच्या निकालामध्ये राज्यात पहिला येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही शैक्षणिक क्रांतीच म्हणावी लागेल.

Konkan division first in 10th and 12th exams | HSC, SSC Exam Result: शंभर नंबरी यशाचा सिंधुदुर्ग पॅटर्न, उज्ज्वल परंपरा कायम

HSC, SSC Exam Result: शंभर नंबरी यशाचा सिंधुदुर्ग पॅटर्न, उज्ज्वल परंपरा कायम

googlenewsNext

महेश सरनाईक

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील पाया मानला जाणाऱ्या दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचे निकाल आता जाहीर झाले आहेत. कोरोनाच्या सावटाखाली मागील दोन वर्षात मुले मानसिक तणावाखाली असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डची निर्मिती झाल्यानंतर गेली १२ वर्षे म्हणजे एक सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांच्या निकालामध्ये राज्यात पहिला येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही शैक्षणिक क्रांतीच म्हणावी लागेल.

भौगोलिक परिस्थितीचा सामना करत रडत न बसता मुलांनी मिळविलेल्या या सातत्यपूर्ण यशाचे कौतुकच केले. विद्यार्थ्यांचे हे शंभर नंबरी यश मिळण्यासाठी त्यांना अनेक हातांची मदत होत आहे. अगदी घरातील आई, वडील, बहीण, भाऊ, काका काकू असो अथवा गावातील ज्येष्ठ नागरिक, वडीलधारी माणसे असो. प्रत्येकजण हे यश मिळविण्यासाठी झटत आहे. आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे प्रमुख काम शिक्षकाकडून होते. जशी लहान मुलांचा पहिला गुरू आई, वडील असतात. त्यानंतर विद्यार्थी दशेत त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांची मोठी जबाबदारी असते. आपली शाळा, आपला समाज आणि आपले गुरू हा आपलेपणा जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत असे यश मिळूच शकत नाही.

सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षांचे आहे. त्यामुळे शालेय शिक्षण घेत असताना अवांतर शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जादा वर्ग घेणे, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपल्या पाल्याबाबतच्या कमजाेर बाबी लक्षात आणून देऊन त्यातून तो विद्यार्थी बाहेर पडून चांगले यश कसे मिळवू शकेल याबाबतचे समग्र मार्गदर्शन शाळा शाळांमधून केले जात आहे. त्याचे फलित आपल्याला गेली १२ वर्षे सातत्याने निकालाच्या माध्यमातून प्रतिबिंबीत होत आहे. एकेकाळी शिक्षणाचा लातूर पॅटर्न होता. पण, ज्यावेळी कोल्हापूर बोर्डातून वेगळा करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरीमध्ये कोकण बोर्डाची निर्मिती झाली त्यानंतर बारा वर्षांचा म्हणजे एक तपाचा कालावधीत शिक्षणाचा कोकण पॅटर्न उदयास आला. गेल्या १२ वर्षात असे एकही वर्ष नाही की, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मागे पडला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याने तर सतत १२ वर्षे प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. ग्रामीण भाग, लांब वाडी वस्तीत राहणारा समाज, दऱ्या खोऱ्यांमध्ये विखुरलेली घरे, वर्षाचे साधारणपणे सात ते आठ महिने पडणारा संततधार पाऊस, दऱ्या, खोऱ्यातून, जंगलातून वाट काढत शाळेतील शिक्षण पूर्ण करणारा येथील विद्यार्थी ज्यावेळी ९९ टक्के गुण मिळवितो, त्यावेळी त्याचे ते यश निश्चितच शंभर नंबरी आहे. जिल्ह्यातील तब्बल २०० शाळांचा निकाल १०० टक्के लागतो. हे काही एखाद्या जादूच्या कांडीने होत नाही. त्यासाठी वर्षभर शिक्षक, पालक, विद्यार्थी, संस्थाचालक घेत असलेल्या मेहनतीचे फळ आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा पाया आता घट्ट झाला आहे. आता हळूहळू उच्च शिक्षणासाठीच्या सोयीसुविधांचे जाळे निर्माण करायला लागेल. तसे आता हळूहळू त्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नदेखील करत आहेत. उच्च शिक्षणासाठी इंजिनीअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, पॉलिटेक्निक यासारखी दालने आता येथे होत आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांबाबतची मार्गदर्शन केंद्रे निर्माण केली जात आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी किवा स्पर्धा परीक्षांसाठी मुंबई, पुणे, गोवा किवा राज्याच्या अन्य भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता स्थानिक पातळीवरच सर्व दालने खुली होत आहेत. भविष्यात उच्च शिक्षणातही सिंधुदुर्गचा झेंडा उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Konkan division first in 10th and 12th exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.