कोकण विभागीय प्रदर्शन सावंतवाडीत

By Admin | Published: March 16, 2016 08:27 AM2016-03-16T08:27:35+5:302016-03-16T08:34:36+5:30

१८ मार्चपासून प्रारंभ होणार : १९ मार्चला ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Konkan divisional performance in Sawantwadi | कोकण विभागीय प्रदर्शन सावंतवाडीत

कोकण विभागीय प्रदर्शन सावंतवाडीत

googlenewsNext

सिंधुदुर्गनगरी : कोकण विभागीय प्रदर्शन १८ ते २३ मार्च या दरम्यान सावंतवाडी जिमखाना मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनामध्ये कोकणातील पाच जिल्ह्यातून २८४ बचतगट सहभागी होणार आहेत. विभागीय प्रदर्शन सिंधुदुर्गात पहिल्यांदाच होत असून १९ मार्चला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या दिवशी विभागीय महिला मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकण विभागीय सरस प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, विषय समिती सभापती अंकुश जाधव, दिलीप रावराणे, आत्माराम पालयेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर उपस्थित होते.
कोकण सरस प्रदर्शनात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे या जिल्ह्यातील बचतगट सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात कृषी पर्यटन यासोबत तांदूळ महोत्सव, बॅँकांच्या योजना, स्वच्छ भारत मिशन यांचेही स्टॉल ठेवण्यात येणार आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गट व स्वरोजगारी यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येते. सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ, देवगड या चार तालुक्यामध्ये वर्धिणी प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार असून यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, खासदार भालचंद्र मुणगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, प्रधान सचिव व्ही. गिरीराज उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये १७६ स्टॉल उभारले जाणार असून २८४ बचतगट सहभागी होणार आहेत. बांबू हस्तकला, लाकडी खेळणी, खाद्य पदार्थ, काजू, कोकम यासारख्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या दिवशी सायंकाळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील तारपानृत्य, दिंडी नृत्य, फुगडी, दशावतार यांच्यासह ‘गेले भजनाक पोचले लग्नाक’ व ‘सारे प्रवासी घडीचे’ ही नाटकेही सादर केली जाणार आहेत. या प्रदर्शनाला लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण व आरोग्य विभागाच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्यावतीने करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Konkan divisional performance in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.