कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक: कणकवली तालुक्यात सकाळी ११ वाजेपर्यंत शांततेत २४.१७ टक्के मतदान!
By सुधीर राणे | Published: June 26, 2024 01:44 PM2024-06-26T13:44:32+5:302024-06-26T13:45:49+5:30
कणकवली: कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत मतदानाला प्रारंभ झाला. कणकवली तालुक्यात सकाळी ...
कणकवली: कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत मतदानाला प्रारंभ झाला. कणकवली तालुक्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.१७ टक्के मतदान झाले. दरम्यान, कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे तर महाविकासाघाडीकडून काँग्रेसचे रमेश किर निवडणूक लढवीत आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करण्याची मुदत आहे. कणकवली तालुक्यातील ३८६० मतदार आहेत. त्यासाठी तालुक्यात सहा मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
कणकवली तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटमध्ये दोन मतदान केंद्रे, कासार्डे माध्यमिक विद्यालय येथे एक केंद्र, कणकवली तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांचे दालन व संगणक कक्ष अशी दोन मतदान केंद्रे तर कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात एक अशी एकूण सहा मतदान केंद्रे आहेत. यात कासार्डे मतदान केंद्रांवर - ५३७ मतदार, कणकवली-७७६, कणकवली अ- ७७६, कणकवली ब- ८९८, फोंडाघाट-४२१, फोंडाघाट अ-४५२ एवढे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुतीचा तर श्रीधर नाईक चौकात महाविकास आघाडीचा बुथ लावण्यात आला आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी जगदिश कातकर,कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार मंगेश यादव, शिवाजी राठोड, निवडणूक नायब तहसीलदार प्रिया हर्णे, शिरस्तेदार गौरी कट्टे आदी अधिकारी काम पाहत असून प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचारी, पोलिस, मायक्रो ऑब्झरव्हर, शिपाई असे प्रत्येकी ७ कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.