कोकण रेल्वे गेटमनचे वेतन थकीत, एम्प्लॉइज युनियनने वेधले व्यवस्थापकीय संचालकांचे लक्ष

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 31, 2024 06:42 PM2024-05-31T18:42:07+5:302024-05-31T18:42:28+5:30

रजनीकांत कदम कुडाळ : कोकण रेल्वेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या गेटमन कामगारांचे गेले दोन महिन्यांचे वेतन कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराने ...

Konkan Railway gateman salary outstanding for last two months | कोकण रेल्वे गेटमनचे वेतन थकीत, एम्प्लॉइज युनियनने वेधले व्यवस्थापकीय संचालकांचे लक्ष

कोकण रेल्वे गेटमनचे वेतन थकीत, एम्प्लॉइज युनियनने वेधले व्यवस्थापकीय संचालकांचे लक्ष

रजनीकांत कदम

कुडाळ : कोकण रेल्वेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या गेटमन कामगारांचे गेले दोन महिन्यांचे वेतन कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराने दिलेले नाही. याकडे कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियनने कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालकांचे लक्ष वेधत यावर तोडगा न निघाल्यास पर्यायाने आंदोलन करण्याचा इशारा कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियनचे कार्याध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी दिला आहे.

युनियनच्या देण्यात आलेल्या या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले की, कोकण रेल्वे प्रशासनाने गेल्या काही महिन्यात कंत्राटी पद्धतीने गेटमनची नियुक्ती केली. सदरील गेटमन या पदावर काम करण्याकरिता मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट प्रभात भट सिक्युरिटी एजन्सी या कंपनीला देण्यात आले. ही कंपनी कमी पगारात कर्मचाऱ्यांना वापरून घेत असून देण्यात येणारे वेतनही गेले दोन महिने दिलेले नाही.

काही कारणास्तव कोकण रेल्वेने कंत्राटदार कंपनीला दंड केला होता. त्याचा राग कंत्राटदार कर्मचाऱ्यांवर काढत आहे. कोकण रेल्वेने दंड केलेली रक्कम कंत्राटदार या कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल करीत आहे. कर्मचाऱ्यांनी रक्कम न दिल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या कंत्राटदारामार्फत प्रकाश निकम हे देत आहेत. त्यांना काम करताना काही त्रास झाल्यास वैद्यकीय मदत किंवा उपचार मिळणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र जबरदस्तीने लिहून घेतले आहे. या सर्व बाबीवर कोकण रेल्वेने लक्ष द्यावे.

गेटमन हे जबाबदारीचे पद आहे. याचा प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करता गेटमन हा तणाव मुक्त वातावरणात काम करणे आवश्यक आहे. कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. कोकण रेल्वे प्रशासन आणि प्रभात भट सिक्युरिटी एजन्सी यांच्या वादात कंत्राटी गेटमन भरडला जाऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी. एकतर कंत्राटदारांवर कारवाई करून कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदार नेमावा. अन्यथा केंद्रीय कायद्याप्रमाणे हक्काचे वेतन या कर्मचाऱ्यांना द्यावे.

यावर तोडगा न निघाल्यास पर्यायाने आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल. त्याची पूर्ण जबाबदारी कंत्राटदार व रेल्वे प्रशासन यांची राहील, असा इशारा कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियनचे कार्याध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी कोकण रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिला आहे

Web Title: Konkan Railway gateman salary outstanding for last two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.