कोकण रेल्वे ठप्प
By admin | Published: May 4, 2015 12:30 AM2015-05-04T00:30:23+5:302015-05-04T00:36:25+5:30
‘दुरांतो’ला अपघात : एक्स्प्रेसचे १० डबे घसरले
मडगाव (गोवा) / रत्नागिरी/ सावंतवाडी : गोव्यातील मडगाव ते बाली या रेल्वे स्थानकादरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे दहा डबे रुळांवरून घसरून अपघात झाल्याने कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मडगावकडे जाणाऱ्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवल्याने व उशिराचे कारणही न सांगितल्याने प्रवासी संतप्त झाले. सावर्डे स्टेशनमास्तरना प्रवाशांनी घेराव घालून जाब विचारला. मार्गावरील लांब पल्ल्याच्या पाच गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्याचे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. अन्य गाड्या सहा ते दहा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
दुरांतो अपघातानंतर कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या. त्या का थांबविण्यात आल्या याबाबत सूचना देण्याचे सौजन्यही रेल्वेने दाखविले नाही. गाड्या थांबल्यानंतर त्या क्रॉसिंगसाठी असतील, अशा भ्रमात प्रवासी होते. मात्र, तास उलटून गेला तरी गाड्या हालत नसल्याने प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. त्यामुळे प्रवाशांच्या रोषाला त्या त्या स्थानकांच्या प्रमुखांना सामोरे जावे लागले.
चिपळूणजवळील सावर्डे रेल्वे स्थानकावर सीएसटी-मडगाव ही उन्हाळी सुटीतील विशेष गाडी सकाळी सात वाजता आली. त्यानंतर तब्बल तासभर कोणतीही उद्घोषणा न झाल्याने संतप्त प्रवाशांनी स्टेशनमास्तरना घेराव घातला. जाब विचारला. (पान १ वरून) त्यावेळी दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही माहिती प्रवाशांना का दिली नाही, या प्रश्नावर ते निरुत्तर झाले. सकाळी दहा वाजल्यानंतर ही गाडी रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली.
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या अन्य गाड्याही विविध स्थानकांत थांबल्या होत्या. दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेस संगमेश्वरजवळील आरवली स्थानकात, तर मडगावकडे जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस राजापूरजवळील आडवली स्थानकावर थांबविण्यात आली होती. रत्नागिरी रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी सात वाजता आलेली मुंबई-तिरुनेलवेल्ली प्रीमियर सुपरफास्ट सकाळी साडेदहा वाजता मडगावकडे रवाना झाली. ही गाडी मडगाववरून अन्य मार्गे वळविण्यात आली. सायंकाळी सात वाजता रत्नागिरीत आलेली नेत्रावती आठ वाजता मडगावकडे रवाना झाली. त्यानंतर हापा, मत्स्यगंधा एक्स्प्रेसही मडगावकडे रवाना झाल्या. रात्री मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या कोकणकन्या व राज्यराणी एक्स्प्रेस उशिराने धावत होत्या. आज, सोमवारी सकाळपर्यंत मार्गदुरुस्ती होऊन रेल्वेसेवा पूर्ववत होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अपघातामुळे कोकण रेल्वेने काही गाड्या अन्य मार्गाने वळविल्या असून, त्यामध्ये ओखा-एर्नाकुलम, सीएसटी एर्नाकुलम, निजामुद्दीन त्रिवेंद्रम, पुणे-एर्नाकुलम, कोचुवेली-बिकानेर या गाड्यांचा समावेश आहे. मंगलोर-मडगाव मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी संतप्त झाले होते. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून रत्नागिरी रेल्वे स्थानकात शहर पोलीस ठाण्याचे सहा पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.
तसेच रेल्वे पोलीसही बंदोबस्त पाहत होते. जिल्ह्यातील अन्य रेल्वे स्थानकांवरही पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आले होते. त्याठिकाणीही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तिकिटे रद्द, परतावा दिला
लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या अन्य मार्गे वळविण्यात आल्या, त्या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना जिल्ह्यातील रत्नागिरीसह सर्वच स्थानकांवर ताटकळत राहावे लागले. अखेर या गाड्याच अन्य मार्गे वळविण्यात आल्याने त्या प्रवाशांना त्यांची रेल्वे तिकिटे रद्द करून परतावा देण्यात आला. मात्र, प्रवाशांना इच्छीत स्थळी जाण्यासाठी पर्याय स्वीकारावा लागला.
खाद्य, पाण्याचीही टंचाई
मुख्य शहरापासून दूर व अपुऱ्या सुविधा असलेल्या छोट्या रेल्वे स्थानकांवर गाड्या काही तास थांबविण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. छोट्या स्थानकांवर एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या प्रवाशांना खाण्याच्या वस्तू मिळणेही दुरापास्त झाले. त्यामुळे लहान मुलांचे खूप हाल झाले. सावर्डे, आरवली व आडवली येथे प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागला. या गाड्या किमान संगमेश्वर, रत्नागिरी किंवा राजापूरसारख्या स्थानकांवर थांबवाव्यात, अशी प्रवाशांची मागणी होती. मात्र, रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केले.
सिधुदुर्गात रेल्वे सेवा सुरळीत, गाड्यांची वेळेत ये-जा
- सावंतवाडी : गोवा-मडगाव येथील बाली बोगद्यानजीक दुरांतो एक्सप्रेसचे दहा डबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पण याचा फटका सिंधुदुर्गमधील रेल्वे सेवेला बसला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकाळी कोकणकन्या एक्स्प्रेस तसेच अन्य गाड्या सुरळीत सुरू होत्या. तर सायंकाळची मुंबईकडे जाणारी कोकणकन्या रेल्वे गाडी आपल्या वेळेत रवाना झाली.
- मुंबईहून कारवारकडे जाणारी दुरांतो एक्स्प्रेस गाडीचे मडगाव नजीक असलेल्या बाली बोगद्याजवळ दहा डबे घसरले. यात कोणीही जखमी झाले नसले, तरी कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक मात्र पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. असे असले तरी त्याचा फटका कोकण रेल्वेला बसला नाही. कोकण रेल्वे मार्गावरच्या सर्व गाड्या वेळेत आल्या. सकाळी दुरांतो एक्स्प्रेसनंतर कोकण कन्या एक्स्प्रेसही मुंबईहून गोव्याकडे जाण्यास निघाली होती. ती आपल्या नेहमीच्या वेळेत सावंतवाडीत आली. दिवा एक्स्प्रेसही नेहमीच्या वेळेत मुंबईकडे रवाना झाली आहे.