मालवाहतुकीसाठी कोकण रेल्वेचा आता खास ‘फिरता रॅम्प’
By admin | Published: February 19, 2015 11:04 PM2015-02-19T23:04:23+5:302015-02-19T23:40:26+5:30
तांत्रिक विभागाची कमाल
रत्नागिरी : कोकण रेल्वेला मालवाहतुकीतून अपेक्षित उत्पन्न मिळावे, यासाठी गुडस् ‘लोडिंग-अनलोडिंग’ची व्यवस्था सर्व रेल्वे स्थानकांवर करण्याची अभिनव सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी कोठेही नेता येईल, असा विशेष रॅम्प कोकण रेल्वेने विकसित केला आहे. हापूस वा कोकणातील अन्य उत्पादने कोणत्याही रेल्वे स्थानकावरून मालगाड्यांमध्ये नेणे शक्य होणार आहे. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष भानू प्रकाश तायल यांनी दिलेल्या या माहितीमुळे कोकणातील व्यवसायांना उभारी मिळणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या माल वाहतूक गाड्यांमधून कोकणातील माल अन्यत्र पाठवायचा असेल तर तो कोलाडला नेणे आवश्यक होते. त्यामुळे येथील उद्योजक, बागायतदार यांची गैरसोय होत होती. हा प्रश्न गेले अनेक दिवस ऐरणीवर होता. कोकण रेल्वेला प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप कोकण रेल्वेला माल वाहतुकीपेक्षा प्रवासी वाहतुकीतूनच अधिक उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्गावरून सध्या दररोज ६० गाड्या धावत आहेत. प्रवासी वाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळत असल्याने प्रवासी, एक्सप्रेस अशा विविध गाड्या वाढवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मालवाहतुकीतून मात्र त्यामानाने कमी उत्पन्न मिळत आहे.अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या कोकण रेल्वेला गेल्या पाच वर्षांच्या काळात मात्र नक्त नफा (नेट प्रॉफीट) मिळत आहे. परंतु माल वाहतुकीतून मात्र अपेक्षित उत्पन्न अजूनही मिळालेले नाही. गेल्या तीन वर्षांच्या काळात सातत्याने माल वाहतुकीपेक्षा प्रवासी वाहतुकीचे वार्षिक उत्पन्न अधिक आहे. (प्रतिनिधी)
तांत्रिक विभागाची कमाल
गेल्या तीन वर्षात सातत्याने कमी असलेले कोकण रेल्वेचे मालवाहतुकीतील उत्पन्न वाढवणे हे कोकण रेल्वेसमोर मोठे आव्हान ठरले. हे आव्हान पेलण्यासाठी नेहमीप्रमाणेच कोकण रेल्वेच्या तांत्रिक विभागाने आपल्या तंत्रज्ञानाची कमाल दाखवली आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांच्या अथक मेहनतीतूून माल लोडिंग-अनलोडिंगसाठी खास फिरता रॅम्प तयार करण्यात आला असून, चाचण्यांमध्ये त्याची उपयोगिताही सिध्द झाली आहे. त्यामुळे आता कोकणातील आंबा बागायतदार, अन्य उद्योजकांनीही रेल्वेद्वारे मालवाहतुकीचा लाभ घेतल्यास त्यांच्या वाहतूक खर्चात नक्कीच कपात होईल.
सनप्रवासी वाहतूकमाल वाहतूक
२०११-१२३३२.५२ कोटी३२९.४३ कोटी
२०१२-१३३७६.७२ कोटी३४०.३२ कोटी
२०१३-१४४५१.१२ कोटी४१३.५० कोटी
प्रत्येक स्थानकावर ‘गुड्स लोडिंग-अनलोडिंग’ शक्य.
मालवाहतुकीतून उत्पन्नवाढीसाठी कोकण रेल्वेचा प्रयत्न.
हापूस वा कोकणातील अन्य उत्पादने कोणत्याही रेल्वे स्थानकावरून मालगाड्यांमध्ये नेणे शक्य होणार.
कोकणातील व्यवसायांना उभारी मिळणार.
मालवाहतुकीपेक्षा प्रवासी वाहतुकीचे उत्पन्न अधिक.