कोकण रेल्वेच्या ८ एप्रिल पासून 'समर स्पेशल' गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:37 PM2019-03-14T13:37:56+5:302019-03-14T13:39:59+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कणकवली : प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या 'समर स्पेशल ' गाड्यांमध्ये (०१०५१/५२ )ही गाडी १७ मे ते ७ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ८.४५ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ८.३० वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून १९ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत दर रविवारी दुपारी १२.५० वाजता सुटून दुसर्या दिवशी रात्री १ वाजता २० मिनिटांनी ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. २४ डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे.
दुसरी गाडी(०१०१६/१५) करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर १८ मे ते ८ जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी करमाळीहून दर शनिवारी १२.५०वा. सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
तिसरी विशेष गाडी (०१०४५/४६) १२ एप्रिल ते ७ जून २०१९ या कालावधीत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता ती गोवा- करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून दर शुक्रवारी दुपरी १२.५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी ती लोकमान्य टर्मिनसला पोहोचेल.
चौथी विशेष गाडी(०१०३७/३८) ही ८ एप्रिल ते ३जून २०१९ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहे. ही गााडी दर सोमवारी रात्री १ वाजता १०मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी दुपारी ती १ वाजता २० मिनिटांनी ती सावंतवाडीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी दर सोमवारी दुपारी २.१० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री १ वाजून २० मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. सतरा डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, या समर स्पेशल जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांची सोय होणार आहे. उन्हाळी सुट्टी साठी गावी येणाऱ्या मुंबईकर मंडळींना गर्दीच्या हंगामात त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.