‘कोकण’च ‘टॉप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2016 07:15 AM2016-06-07T07:15:49+5:302016-06-07T07:32:05+5:30
दहावीचा निकाल : पाच वर्षांतील सर्वाेच्च निकाल ९६.५६ टक्के; कोकण विभागात सावंतवाडीची तनया वाडकर प्रथम
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा राज्यात बाजी मारली आहे.
कोकण विभागीय मंडळाचा निकाल ९६.५६ टक्के इतका लागला असून, मंडळाच्या स्थापनेपासूनचा पहिला क्रमांक मंडळाने कायम ठेवला आहे, अशी माहिती मंडळाचे विभागीय सचिव व प्रभारी अध्यक्ष आर. बी. गिरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या तनया वाडकर हिने १०० टक्के गुण मिळवून कोकण बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
राज्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल यंदाही सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर मंडळाने दुसरा (९३.८९ टक्के), तर पुणे मंडळाने तिसरा (९३.३० टक्के) क्रमांक मिळविला आहे. या पत्रकार परिषदेसाठी सहसचिव व माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, सहायक सचिव चंद्रकांत गावडे उपस्थित होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांतून ४० हजार ८५१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३९ हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून २१ हजार ६१ मुले परीक्षेस बसले होते, त्यापैकी २० हजार २९२ मुले (९६.३५ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. १९ हजार ७९० मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी १९ हजार १५४ विद्यार्थिनी (९६.७९ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत.
संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून, मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ०.४४ ने अधिक आहे. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या तनया वाडकरने १०० टक्के गुण मिळवून कोकण विभागीय मंडळात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
पुनर्परीक्षार्थींचा ५१.११ टक्के निकाल
कोकण मंडळातून १६६९ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली होती. त्यापैकी ८५३ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल ५१.११ टक्के इतका लागला आहे. १५ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रके उपलब्ध होणार आहेत. शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, संस्था, विद्यार्थी, समाज सर्वांचे उत्कृष्ट निकालामध्ये श्रेय आहे. वर्षभरातील विविध शैक्षणिक उपक्रम, जादा कोचिंग क्लासेस, सुटीतील क्लासेस व विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील उच्च गुणवत्तेसाठी महत्त्वाची ठरली आहे.
दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉर्इंट’ आहे. कोकण मंडळाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
बारकोड पद्धती कोकणात रूजत असून, त्यामुळे निकालामध्ये पारदर्शकता आली असल्याचे गिरी यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गच अव्वल
कोकण मंडळाच्या स्थापनेपासून सिंधुदुर्ग जिल्हाच कोकण विभागात प्रथम येत आहे. याहीवेळी बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही सिंधुदुर्गनेच प्रथम क्रमांक मिळविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून २७ हजार ५३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २६ हजार ४७१ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल ९६.१२ टक्के लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १३ हजार ३१२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी १२ हजार ९७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.४७ टक्के इतका लागला.
कॉपीचे प्रमाण शून्य टक्के
रत्नागिरी जिल्ह्यात ३९२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२१ माध्यमिक शाळा आहेत. एकूण १०९ परीक्षा केंद्रे आहेत. विभागातून एकूण ४० हजार ८७३ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. मात्र, ४० हजार ८५१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. कोकण बोर्डात कॉपीचे प्रमाण शून्य टक्के आहे. त्यापाठोपाठ राज्यात सर्वांत कमी कॉपीचे प्रमाण मुंबई येथे (०.०१) आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग (०.०३ टक्के) असून, सर्वाधिक प्रमाण औरंगाबाद येथे ०.१८ टक्के
आढळले आहे.
निकालाचा चढता आलेख
मागील दोन वर्षांचा कोकण विभागाचा दहावीचा निकाल पाहता हा आलेख चढताच राहिला आहे. २०१२ मध्ये ८१.३२ टक्के, २०१३ मध्ये ८३.४८ टक्के, तर २०१४ मध्ये ८८.३२ टक्के इतका निकाल लागला होता.